भाजपमध्ये ‘पदवीधर’ तिकिटासाठी महामुकाबला?

– प्रा. सोले की कोहळे? दिवे, वांदिले, राऊत, रेवतकर, देशमुखही चर्चेत; ‘संधी पुन्हा त्यांनाच की जुन्या निष्ठावंतांना!’

The Exposer
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजपच्या गोटात उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. माजी आमदार प्रा. अनिल सोले आणि माजी आमदार सुधाकर कोहळे या दोन प्रमुख नावांभोवती सध्या चर्चेचे केंद्र फिरत असले, तरी सुधीर दिवे, आशिष वांदिले, विजय राऊत, किशोर रेवतकर आणि माजी नगरसेवक गिरीश देशमुख यांचीही नावे चर्चेत आहेत.

एका जागेसाठी अनेकांच्या नावाची चर्चा आणि प्रत्येकाच्या मागे स्वतंत्र राजकीय समीकरणे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या वृत्तांनुसार भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही.

‘कोहळे फॅक्टर’ विरुद्ध ‘जुन्या निष्ठावंतांना संधी’!

सुधाकर कोहळे यांचे नाव चर्चेत येण्यामागे त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव महत्त्वाचा मानला जात आहे. नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टीपद, दक्षिण नागपूरचे आमदारपद, नागपूर शहर भाजप अध्यक्षपद आणि नागपूर ग्रामीण भाजप अध्यक्षपद अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

यानंतर भाजपने त्यांना पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या क्षेत्रात हिंदी भाषिक मतदारांची मोठ्या प्रमाणात संख्या असतांना भाजपने स्थानिक ऐवजी कोहळे यांना संधी दिली होती, हे विशेष. मात्र या निवडणुकीत काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

आता नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अभियानाची जबाबदारी कोहळे यांच्याकडे असल्याने त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. पक्षाच्या संघटनात्मक तयारीत त्यांची भूमिका असल्याने त्यांच्या नावाची असलेली चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.

मात्र याच ठिकाणी भाजपसमोर मोठा प्रश्न!

कोहळे यांच्या राजकीय अनुभवाचा आणि पक्षातील जबाबदाऱ्यांचा विचार केला जात असतानाच भाजपमधील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचाही मुद्दा पुढे येत आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी संघटनात्मक पातळीवर काम करूनही काही कार्यकर्त्यांना अद्याप आमदारकी, विधान परिषद किंवा अन्य मोठी राजकीय संधी मिळालेली नाही. त्यामुळे यावेळी ‘अनुभवी माजी लोकप्रतिनिधी की दीर्घकाळ पक्षासाठी झटणारा निष्ठावंत कार्यकर्ता?’ हा प्रश्न उमेदवारीच्या चर्चेत महत्त्वाचा ठरू शकतो. अर्थात, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असून उमेदवार निवडताना संघटनात्मक काम, मतदारांशी संपर्क, विभागातील स्वीकारार्हता आणि पक्षाच्या निवडणूक रणनीतीचा विचार होण्याची शक्यता आहे.

सोले पुन्हा ‘पदवीधर’च्या मैदानात?

दुसरीकडे माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनीही या मतदारसंघासाठी आपली दावेदारी कायम ठेवल्याची चर्चा आहे. सोले यांनी यापूर्वी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०२० मध्ये विद्यमान आमदार असतानाही भाजपने त्यांना उमेदवारी न देता संदीप जोशी यांना मैदानात उतरवले होते. आता सहा वर्षांनंतर पुन्हा सोलेंचे नाव चर्चेत आल्याने ‘२०२०च्या निर्णयाची पुनरावृत्ती होणार की यावेळी समीकरण बदलणार?’ हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सोलेंच्या समर्थकांनी अलीकडे त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केल्यानेही त्यांच्या दावेदारीबाबत चर्चा रंगली. शिवाय मतदारांशी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क हा त्यांच्या राजकीय तयारीचा भाग असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सध्या भाजपमध्ये ‘सोले विरुद्ध कोहळे’ अशी थेट राजकीय स्पर्धा असल्याची चर्चा रंगली आहे.

दिवे, राऊत, रेवतकर, देशमुखही रिंगणात!

या दोन प्रमुख नावांबरोबरच सुधीर दिवे यांचे नाव संघटनात्मक कामाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे. नागपूर विभागात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचा विचार झाल्यास त्यांची दावेदारीही महत्त्वाची ठरू शकते. विजय राऊत हे दक्षिण-पश्चिम नागपुरातील जुन्या भाजप कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून चर्चेत आहेत. अनेक वर्षांची पक्षनिष्ठा हा त्यांचा प्रमुख राजकीय आधार मानला जात आहे. किशोर रेवतकर यांनी दीर्घकाळ संघटनात्मक काम केल्याने ‘जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी’ या समीकरणात त्यांचे नाव सर्वात पुढे येत आहे. तर माजी नगरसेवक गिरीश देशमुख हे पदवीधर निवडणुकीच्या व्यवस्थापन आणि मतदार नोंदणीच्या कामात सक्रिय असल्याने त्यांचे नावही चर्चेत आहे.

आशिष वांदिले : ‘नवा चेहरा’ म्हणून पर्याय?

या सर्व समीकरणात आशिष वांदिले यांचे नाव वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. संघटनात्मक पातळीवर विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या वांदिले यांनी गोंदिया-भंडारा भागातील संघटनात्मक कामासह नागपूर भाजपमध्येही सक्रिय भूमिका बजावली आहे. महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये संघटनात्मक पातळीवर सक्रिय राहिल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पक्षाने अनुभवी माजी लोकप्रतिनिधींपेक्षा ‘संघटनेतून आलेल्या नव्या चेहऱ्याला संधी’ देण्याचा पर्याय निवडल्यास वांदिले यांचे नावही चर्चेत राहू शकते.

फडणवीस-गडकरी भेटीने चर्चांना वेग

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी सुमारे ९० मिनिटे भेट घेतल्याचे वृत्त आहे. भाजपमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून चर्चा सुरू असतानाच ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात त्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मात्र या बैठकीत उमेदवाराबाबत नेमका कोणता निर्णय झाला, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ‘उमेदवारीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे की अजूनही खलबते सुरू आहेत?’ हा प्रश्न अधिक चर्चेत आला आहे.

एक जागा… नावे अनेक!

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. २०२० मध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव करून भाजप-जनसंघाच्या ५८ वर्षांच्या वर्चस्वाला धक्का दिला. वंजारी यांना ६१,७०१, तर जोशी यांना ४२,७९१ मते मिळाली होती.

यावेळी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे भाजपसाठी उमेदवार निवडणे हा केवळ एका व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय राहिलेला नाही. संपूर्ण नागपूर विभागातील संघटनात्मक समीकरणे, सामाजिक प्रतिनिधित्व, मतदार नोंदणी, स्थानिक संपर्क आणि जुन्या कार्यकर्त्यांना दिला जाणारा राजकीय संदेश या सर्व बाबींचा विचार होण्याची शक्यता आहे. भाजपच्या दरबारात आता एकच सवाल! ‘पदांची शिदोरी असलेल्या अनुभवी चेहऱ्यावर पुन्हा विश्वास की वर्षानुवर्षे झटणाऱ्या निष्ठावंताला मोठी संधी?’

सोले, कोहळे, दिवे, वांदिले, राऊत, रेवतकर की देशमुख?

की या सर्व चर्चांना बाजूला सारत पक्षश्रेष्ठी एखाद्या अनपेक्षित नव्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब करणार? अधिकृत उमेदवाराची घोषणा होईपर्यंत भाजपमधील ही रस्सीखेच कायम राहण्याची चिन्हे आहेत. महिलांमध्ये माजी महापौर नंदा जिचकार, वैशाली रमेश चोपडे यांची ही नावे चर्चेत असल्याचे म्हटले जाते. असे असतांना पक्षहित, संघटनात्मक वाढ आणि नागपूर विभागातील व्यापक राजकीय समीकरणांचा विचार करून योग्य व्यक्तीला संधी देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठी घेतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More