चोरीच्या संशयातून ‘मॉब जस्टिस’चा थरार! दोन तरुणांना पकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू

– बेलतरोडीतील न्यू मनीषनगरमध्ये संतापजनक घटना
– मारहाण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

The Exposer
नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू मनीषनगर परिसरात चोरीच्या संशयावरून दोन तरुणांना पकडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. या मारहाणीत सुमेध राजेंद्र गजभिये या तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी मारहाणीत सहभागी असल्याच्या संशयावरून तीन जणांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यू मनीषनगर येथील मॉडेल मिल सोसायटीमध्ये मंगळवारी दुपारी सुमारे 1.45 वाजता 61 वर्षीय उषा देवीदास धार्मिक यांच्या घरात दोन तरुण शिरल्याचा आरोप आहे. यातील एका तरुणाने उषा यांच्या गळ्यावर चाकू ठेवून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. महिलेने प्रतिकार करत आरडाओरड केल्यानंतर आरोपी मंगळसूत्राचा तुटलेला भाग घेऊन पळून गेल्याचे प्राथमिक माहितीत नमूद आहे.

आवाज ऐकून उषा यांच्या सुनेने हॉलमध्ये धाव घेतली असता आरोपींनी तिच्याकडूनही दागिने आणि रोख रक्कम मागितल्याचे सांगण्यात येते. तिने मुलाला खोलीत ठेवण्याचा बहाणा करून स्वतःला आतून बंद केले आणि पती तसेच शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

यानंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी परिसरात शोध सुरू केला. काही अंतरावर दुचाकीजवळ नरसाळा येथील सुमेध राजेंद्र गजभिये आणि त्याचा साथीदार दीपक पाटील दिसून आले. चोरीच्या घटनेशी त्यांचा संबंध असल्याच्या संशयातून त्यांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर मारहाण सुरू झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सुमेधसह तिघांना ताब्यात घेतले; मात्र दीपक पाटील घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात येते. सुमेधला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

तरुणाच्या मृत्यूनंतर परिसरात तणाव

सुमेधच्या मृत्यूची माहिती परिसरात पसरताच परिस्थिती संवेदनशील बनली. खबरदारीचा उपाय म्हणून बेलतरोडी पोलीस ठाणे आणि घटनास्थळाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अजनी एसीपी नरेंद्र हिवरे, गुन्हे शाखेचे एसीपी वैभव जाधव, डीसीपी रश्मिता राव, गुन्हे शाखेचे डीसीपी दीपक अग्रवाल, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी आणि सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला.

तपासातूनच घटनेमागील संपूर्ण सत्य स्पष्ट होणार

महत्वाचे असे की, चोरीचा संशय असला तरी कायदा हातात घेऊन एखाद्याला मारहाण करण्याचा अधिकार कोणालाही नाही. सुमेधचा मृत्यू नेमका मारहाणीमुळे झाला की अन्य कारणामुळे, तसेच या संपूर्ण प्रकरणात कोणाची नेमकी भूमिका होती, याचा तपास पोलीस करीत आहेत. तपासातूनच घटनेमागील संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांचे या प्रकरणाच्या तपासाकडे लक्ष लागलें आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More