फार्म हाऊसच्या गेट-टुगेदरला काळाचा घाला; स्विमिंग पूलमध्ये डोक्यावर आदळून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू!

– गणेश विसर्जनानंतर २०१३ बॅचचे नऊ मित्र पार्टीसाठी एकत्र; जलतरणाचा आनंद घेताना सचिन आवारी यांचा दुर्दैवी अंत

The Exposer
नागपूर : गणेश विसर्जनानंतर मित्रांसोबत गेट-टुगेदर पार्टीचा आनंद लुटण्यासाठी फार्म हाऊसवर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा स्विमिंग पूलमध्ये झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनेगाव परिसरातील बालगिरी फार्म हाऊस येथे मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेमुळे आनंदाचे वातावरण क्षणार्धात शोकाकुल झाले.

मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव सचिन घनश्याम आवारी (वय ३८) असून ते गायत्री नगर, सचिन लेआउट, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर येथील रहिवासी होते. ते रेल्वे पोलीस दलात कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष २०१३ मध्ये पोलीस विभागात एकत्र भरती झालेले नऊ मित्र दरवर्षी गेट-टुगेदर आयोजित करतात. यंदा १६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन झाल्यानंतर सर्वांनी एकत्र पार्टी करण्याचे ठरवले. त्यानुसार सचिन आवारी यांच्यासह नऊ बॅचमेट तीन चारचाकी वाहनांतून कुही तालुक्यातील सोनेगाव परिसरातील बालगिरी फार्म हाऊसवर पोहोचले.

पार्टीदरम्यान मित्रांनी स्वतः भोजन तयार केले. त्यानंतर रात्री सुमारे १.३० ते १.४५ वाजताच्या सुमारास सर्वजण स्विमिंग पूलमध्ये तैरत होते. याचवेळी सचिन आवारी यांनी पूलमध्ये उडी घेतली. मात्र, उडी मारताना ते डोक्याच्या दिशेने खाली पडले आणि पूलमधील टाइल्सवर डोके आदळल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर ते पाण्यात बुडाले.

मित्रांनी तातडीने त्यांना पाण्याबाहेर काढले. याबाबत राहुल राजगिरे यांनी कुही पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुही पोलीस ठाण्याचे हवालदार प्रशांत खडतकर आणि हरिदास चाचेरकर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

या गेट-टुगेदरमध्ये राहुल हरीचंद्र राजगिरे, विपिन पिल्लेवान, नितुल सावजी, शिवशंकर बिसेन, निलेश निकोडे, यशवंत गायकवाड, देवेंद्र राकेश आणि प्रतिक ईटनकर यांच्यासह सचिन आवारी सहभागी झाले होते. यातील काहींच्या बदल्या नागपूर शहराबाहेर झाल्या आहेत, तर काही जण रेल्वे पोलीस दलात कार्यरत आहेत.

वर्षानुवर्षे मैत्रीच्या आठवणी जपण्यासाठी होणाऱ्या या गेट-टुगेदरला यंदा मात्र काळ्या दुर्दैवाची किनार लाभली. काही क्षणांपूर्वी मित्रांसोबत आनंदात असलेले सचिन आवारी अचानक कायमचे दूर गेल्याने २०१३ बॅचमधील त्यांच्या सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने पोलीस दलातही हळहळ व्यक्त होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More