अजनीत ‘एमडी’चा धडाका; 11.160 ग्रॅम मेफेड्रोनसह आरोपी जेरबंद!

– सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई; ₹44,980 किमतीचा मुद्देमाल जप्त, चंद्रपूर कनेक्शनचा तपास सुरू

The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत 11.160 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केले. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून एमडीसह मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ₹44,980 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही कारवाई 30 सप्टेंबर 2026 रोजी रात्री सुमारे 9.50 वाजता शताब्दी चौकाकडून ओंकारनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली.

11.160 ग्रॅम एमडीसह आरोपी ताब्यात

सामाजिक सुरक्षा पथकाला मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आली. यावेळी अब्दुल शिराज अब्दुल गफार (वय 38) याला ताब्यात घेण्यात आले. तो मूळचा हलधरपूर, सुखरपाडा, जिल्हा कटक, ओडिशा येथील रहिवासी असून सध्या नागपुरातील शताब्दी चौक, काशीनगर परिसरात राहत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपीच्या ताब्यातून 11.160 ग्रॅम एमडी, अंदाजे किंमत ₹33,480, एक मोबाईल फोन ₹10,000 आणि ₹1,500 रोख असा एकूण ₹44,980 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापूर्वी सुद्धा दुसऱ्या एका प्रकरणात शताब्दी चौकात एका परप्रांतीय अमली तस्करास अटक करण्यात आली होती.

चंद्रपूर कनेक्शन तपासाच्या केंद्रस्थानी

पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला आरोपी रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी भद्रावती पोलीस ठाणे, चंद्रपूर येथे गुन्हा क्र. 632/2026, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात ‘राहुल’ आणि ‘डेवील’ नावाचे दोन इसम, रा. चंद्रपूर हे पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे या एमडी प्रकरणामागील पुरवठा साखळी आणि चंद्रपूरशी असलेला संभाव्य संबंध तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 500/2026 दाखल करण्यात आला असून एनडीपीएस कायदा कलम 8(क), 22(ब) आणि 29 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा शाखा, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तक्रारदार म्हणून सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस हवालदार सुशील जानराव बहिरे यांचे नाव नोंदविण्यात आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून जप्त केलेला अमली पदार्थ नेमका कुठून आणला गेला आणि त्याचा पुढील पुरवठा कोणाला होणार होता, याचा तपास केला जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More