– घरफोडीचा तपास लांबल्याने तक्रारदाराची अनोखी शक्कल
– चोरट्यांची माहिती देणाऱ्यास थेट १ लाखांचे बक्षीस जाहीर
The Exposer
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या तपासाला अपेक्षित गती मिळत नसल्याने तक्रारदाराने चक्क स्वतःच्या घराच्या भिंतीवर पोस्टर लावून चोरट्यांची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकारामुळे “फिर्यादीला वाठोडा पोलिसांवर विश्वास नाही काय?” असा सवाल परिसरात उपस्थित होत आहे.

१२ जून २०२६ रोजी तक्रारदाराच्या घरात घरफोडी झाली. चोरट्यांनी घरातून रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू झाला; मात्र बराच कालावधी उलटूनही चोरट्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने तक्रारदाराने थेट नागरिकांकडे मदतीचे आवाहन केले.
पोलिसांच्या तपासाऐवजी नागरिकांकडून मदतीची अपेक्षा?
तक्रारदाराने लावलेल्या पोस्टरवर घरफोडीची माहिती देत चोरट्यांचा शोध लागण्यासाठी मदत करणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे नमूद केले आहे. पोस्टरवर संपर्क क्रमांकही देण्यात आले आहेत.
या प्रकारामुळे पोलिस तपासाबाबत तक्रारदाराच्या मनात निर्माण झालेल्या अपेक्षा आणि नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. गुन्हा दाखल करून तपास सुरू असताना फिर्यादीनेच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी बक्षीस जाहीर करण्याची वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘तपास सुरू आहे’च्या पलीकडे आता निकालाची अपेक्षा
घरफोडीच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, घटनास्थळावरील पुरावे आणि संभाव्य संशयितांची माहिती महत्त्वाची ठरते. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी तक्रारदाराच्या या कृतीमुळे तपासाच्या गतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तक्रारदाराचा पोलिसांवरील विश्वास कायम ठेवणे आणि घरफोडीचा छडा लावून आरोपींपर्यंत पोहोचणे—वाठोडा पोलिसांसमोर आता हे दुहेरी आव्हान आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















