– त्रिकोणी जागा व ये-जा मार्गात बदल करू नका; RPIची मनपाला ठणकावणी
The Exposer
नागपूर : संविधान चौकातील त्रिकोणी आकाराची सार्वजनिक जागा तसेच आंदोलकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग विधानसभा विस्तारीकरणाच्या नावाखाली कमी किंवा बंद करण्याच्या प्रस्तावाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI), नागपूर शहराने तीव्र हरकत घेतली आहे. “विधानसभा विस्तारीकरणाला विरोध नाही; मात्र लोकशाही आंदोलनांचा मार्ग रोखून सार्वजनिक जागा कमी करण्याचा निर्णय मान्य केला जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका घेत RPIने नागपूर महानगरपालिकेकडे लेखी हरकत नोंदविली.
नागपूर महानगरपालिकेच्या स्थावर विभागाने संविधान चौक परिसरातील त्रिकोणी आकाराची जागा व त्यालगतचा रस्ता विधानसभा विस्तारीकरणासाठी वापरण्याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. या पार्श्वभूमीवर RPI, नागपूर शहराच्या वतीने आज मनपाकडे हरकत निवेदन साद करण्यात आले.
आंदोलनाच्या मार्गावरच घाला का?
संविधान चौक हे सामाजिक, राजकीय, विद्यार्थी, कामगार तसेच विविध लोकशाही आंदोलनांचे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असतात. त्रिकोणी पार्कलगतची जागा आंदोलक आणि नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी महत्त्वाची असल्याने ती कमी केल्यास आंदोलनाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक व नागरिकांच्या हालचालींवर परिणाम, भविष्यात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विकासाच्या नावाखाली लोकशाही आंदोलनांसाठी उपलब्ध सार्वजनिक जागा आणि प्रवेशमार्ग संकुचित करू नयेत, अशी मागणी RPIने केली आहे.
पर्यायी नियोजन करा; सार्वजनिक जागा अबाधित ठेवा
विधानसभा विस्तारीकरणाचे नियोजन करताना नागरिकांच्या मूलभूत सोयी, सार्वजनिक वापराची जागा आणि आंदोलकांच्या सुरक्षित ये-जा मार्गाचा विचार करणे आवश्यक असल्याचे RPIने निवेदनात नमूद केले आहे.
RPIने मनपाकडे पुढील मागण्या केल्या आहेत
त्रिकोणी पार्कच्या बाजूची विद्यमान सार्वजनिक जागा कमी करू नये, आंदोलक व नागरिकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग कायम ठेवावा, विधानसभा विस्तारीकरणासाठी पर्यायी नियोजनाचा विचार करावा,- सार्वजनिक वापराच्या जागेवर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सामाजिक व राजकीय संघटनांशी चर्चा करावी,
विस्तारीकरणाला विरोध नाही; लोकशाहीचा मार्ग बंद करू नका!
RPIच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, विधानसभा विस्तारीकरणाला पक्षाचा विरोध नाही. मात्र त्यासाठी संविधान चौकातील सार्वजनिक जागा कमी करणे अथवा आंदोलकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग बाधित करणे योग्य नाही. विकासकामे करताना नागरिकांचे अधिकार आणि लोकशाही आंदोलनांसाठी आवश्यक सार्वजनिक अवकाश अबाधित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
RPIच्या शिष्टमंडळाची मनपाकडे धडक
RPI नागपूर प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या नेतृत्वाखाली शहर कार्याध्यक्ष क्षितिज गायकवाड यांच्या वतीने मनपाकडे हरकत निवेदन साद करण्यात आले..यावेळी नागपूर शहर महासचिव रजत महेशगवळी, सुरेश खोब्रागडे, अश्वजीत गायकवाड, धम्मरक्षित मेश्राम, नानाजी धेंगरे, डॉ. चरणजित जनबंधू, राजेश डोंगरे, शामराव हाडके, मुकुंद मेंढे यांच्यासह RPIचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक















