९८,७८२ अर्जांचा ‘सुळसुळाट’! पदवीधर मतदार नोंदणीवर बसपा उमेदवार संजय थुल आक्रमक

– मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; उमेदवारी अर्ज दाखल करताच उपस्थित केला गंभीर सवाल
– ‘व्होट चोरी’च्या संशय, चौकशी मागणी केल्याने राजकीय वर्तुळात उडाली प्रचंड खळबल 

The Exposer
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत BSPचे उमेदवार संजय थुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच मतदार नोंदणी प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मतदार नोंदणीच्या अंतिम चार दिवसांत तब्बल ९८,७८२ अर्ज प्राप्त झाल्याचा दावा करत थुल यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या संदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तसेच नागपूर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना ई-मेलद्वारे असोशिएशन ऑफ सोशियल अँड आरटीआय ऍक्टिव्हिस्ट्स (ASRA) तर्फे अध्यक्ष म्हणून संजय थुल यांनी तक्रार अर्ज पाठवून आक्षेप नोंदविला आहे.

‘चार दिवसांत एवढे अर्ज आले कसे?’ — थुल यांचा थेट सवाल

संजय थुल यांच्या म्हणण्यानुसार, २२ सप्टेंबरपर्यंत नागपूर विभागात १ लाख १४ हजार ४०४ अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, त्यानंतरच्या अवघ्या चार दिवसांत आणखी ९८,७८२ अर्ज प्राप्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

यापैकी नागपूर जिल्ह्यातच ६७,३१५ अर्ज आल्याचे सांगण्यात येत आहे. एवढ्या अल्प कालावधीत इतक्या मोठ्या संख्येने अर्ज कोणत्या पद्धतीने स्वीकारले गेले, त्यांची छाननी कशी झाली आणि किती अर्जांना मंजुरी देण्यात आली, याचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करण्याची मागणी थुल यांनी केली आहे.

‘बॅकडोअर एंट्री’चा संशय; संपूर्ण प्रक्रिया तपासा

अंतिम टप्प्यात मोठ्या प्रमाणावर अर्ज एकत्रितपणे अर्थात ‘बल्क’ स्वरूपात स्वीकारण्यात आले असावेत, असा संशय व्यक्त करत थुल यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही केवळ अर्जांची संख्या वाढण्याची बाब नसून, मतदार यादीच्या पारदर्शकतेशी आणि निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेशी संबंधित प्रश्न असल्याचे थुल यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याचे सांगितले.

OTP प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह

मतदार नोंदणीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या OTP पडताळणी व मंजुरी प्रक्रियेबाबतही थुल यांनी आक्षेप घेतला आहे. काही अर्जांना नियमबाह्य पद्धतीने मंजुरी देण्यात आली का, याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नसल्याने निवडणूक प्रशासनाने OTP मंजुरीची प्रक्रिया, संबंधित लॉग आणि अर्जांच्या मंजुरीची संपूर्ण माहिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

CCTV, Server Log आणि IP Addressचे फॉरेन्सिक ऑडिट करा

मतदार नोंदणीतील कथित गोंधळाची सत्यता तपासण्यासाठी संजय थुल यांनी प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये अंतिम चार दिवसांतील ९८,७८२ अर्जांची स्वतंत्र चौकशी करावी, अर्ज स्वीकृती केंद्रांचे CCTV फुटेज तपासावे व सुरक्षित ठेवावे, संबंधित Computer Logs आणि Server Logs तपासावेत,

अंतिम चार दिवसांची तासागणिक अर्जांची आकडेवारी जाहीर करावी, अर्ज अपलोड करण्यासाठी वापरण्यात आलेल्या संगणकांचे IP Address तपासावेत, संपूर्ण डिजिटल प्रक्रियेचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, नियमबाह्य पद्धतीने अर्ज मंजूर झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, ‘चौकशी होईपर्यंत संशयास्पद अर्जांना ग्राह्य धरून अंतिम मंजुरी देऊ नका’ आदी मागण्यांचा समावेश आहे.

अशाप्रकारे संजय थुल यांनी प्रशासनाकडे संशयास्पद अर्जांची अंतिम मान्यता चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रलंबित ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि नागपूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार पाठवून या संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल; त्याचवेळी मतदार नोंदणीच्या पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर

विशेष म्हणजे, संजय थुल यांनी आज नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी BSPचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच त्यांनी मतदार नोंदणी प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक चर्चेत आला आहे.

९८,७८२ अर्ज नेमके कसे आले? ६७,३१५ अर्ज नागपूर जिल्ह्यातच कसे जमा झाले? त्यापैकी किती अर्ज मंजूर झाले? अर्ज कोणत्या केंद्रांवरून आणि कोणत्या डिजिटल प्रणालीद्वारे अपलोड करण्यात आले? OTP मंजुरीचे लॉग काय सांगतात? या प्रश्नांची उत्तरे आता निवडणूक प्रशासनाकडून अपेक्षित आहेत.

आता प्रशासन काय उत्तर देते, याकडे लक्ष

संजय थुल यांनी उपस्थित केलेले आरोप आणि त्यांच्या तक्रारीनंतर नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी प्रक्रियेची पारदर्शकता हा निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. दरम्यान, मतदार नोंदणीतील कथित अनियमिततेबाबत प्रशासनाचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे थुल यांनी केलेल्या आरोपांची वस्तुस्थिती अधिकृत चौकशी आणि उपलब्ध नोंदींच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. यासंदर्भात ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दैनिक लोकमत वृतप्रकाशित करून सावळागोंधळ समोर आणला, हे विशेष. The Exposer या प्रकरणातील निवडणूक प्रशासनाची अधिकृत भूमिका आणि पुढील कारवाईवर लक्ष ठेवून आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More