संविधान चौकाची जागा गिळंकृत करण्याचा डाव?

– विस्तारीकरणाच्या नावाखाली ऐतिहासिक प्रेरणास्थळाची ओळख पुसू नका; बसपाचा मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला इशारा

The Exposer
नागपूर : नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकातील जागेच्या प्रस्तावित बदलांवर बहुजन समाज पक्षाने (बसपा) तीव्र आक्षेप नोंदवला आहे. विस्तारीकरणाच्या नावाखाली संविधान चौकाची ऐतिहासिक व संविधानिक ओळख कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बसपाने केला असून, याविरोधात मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि नागपूर महापालिका आयुक्तांकडे लेखी हरकत नोंदविण्यात आली आहे.

संविधान चौक हा केवळ वाहतुकीचा चौक नसून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्याचे आणि संविधानिक मार्गाने जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्याचे महत्त्वाचे केंद्र असल्याचे बसपाने म्हटले आहे.

दरवर्षी १ जानेवारी, २६ जानेवारी, १४ एप्रिल, १४ ऑक्टोबर, २६ नोव्हेंबर आणि ६ डिसेंबर या दिवशी येथे मोठ्या संख्येने अनुयायी येतात. त्याचबरोबर विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर धरणे, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनेही येथे केली जातात. त्यामुळे दिल्लीतील जंतर-मंतर आणि मुंबईतील आझाद मैदानाप्रमाणे नागपूरच्या संविधान चौकाचीही स्वतंत्र ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे बसपाचे म्हणणे आहे.‘जागा कमी पडते, मग विस्ताराऐवजी बदल का?’

बसपा नेत्यांच्या मते, सध्याची जागा अभिवादन, आंदोलन आणि नागरिकांच्या विविध उपक्रमांसाठी आधीच अपुरी पडत आहे. त्यामुळे जागा कमी करण्याऐवजी संविधान चौकाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील पोस्ट ऑफिस, बीएसएनएल कार्यालय तसेच पूर्वी समाजकल्याण विभागाचे कार्यालय असलेल्या जीर्ण इमारतीचा परिसर झिरो माईल्सच्या ऐतिहासिक पिल्लरपर्यंत खुला करून संविधान चौकाचा विस्तार करावा, अशी मागणी बसपाने केली आहे.

या भागाचे योग्य नियोजन केल्यास मुख्य मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सामाजिक प्रश्नांवरील आंदोलने आणि जनतेचा आवाज स्पष्टपणे दिसू शकेल, असेही बसपा नेत्यांनी स्पष्ट केले.

विधानभवन विस्तारासाठी पर्यायी जागांचा वापर करण्याची मागणी

विधानभवनाच्या विस्तारीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता असल्यास विधानभवनाच्या मागील भवन्स हायस्कूल, नॅशनल म्युझियम आणि एफसीआय गोडाऊन परिसरातील उपलब्ध जागांचा विचार करावा, अशी सूचनाही बसपाने केली आहे.

२४ सप्टेंबरची महापालिका जाहिरात रद्द करण्याची मागणी

संविधान चौकाच्या संदर्भात २४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली नागपूर महापालिकेची जाहिरात रद्द करावी, अशी प्रमुख मागणी बसपा शिष्टमंडळाने केली आहे. संविधान चौकाची ऐतिहासिक, सामाजिक आणि संविधानिक ओळख अबाधित ठेवूनच कोणतेही विकासकाम किंवा नियोजन करण्यात यावे, अशी भूमिका पक्षाने मांडली.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट

बसपा महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक संजय जयस्वाल, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, उत्तर नागपूरचे माजी अध्यक्ष राजेश नंदेश्वर, अविनाश गेडाम, युवानेते सदानंद जामगडे आणि अंकित थुल यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खंडे यांची भेट घेऊन निवेदन साद केले.

संविधान चौकाच्या जागेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नागरिक, सामाजिक संघटना आणि संबंधित घटकांशी चर्चा करावी तसेच या स्थळाची ऐतिहासिक व सार्वजनिक भूमिका लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी बसपाने केली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More