नागपूरच्या हर्षल डोर्लीकरची जागतिक भरारी; Google-समर्थित XPRIZE मध्ये ५० हजार डॉलरचा प्रतिष्ठित पुरस्कार!

– २६ हजारांहून अधिक स्पर्धकांमध्ये ‘कॉस्मो’चा डंका

The Exposer 
नागपूर : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात नागपूरच्या तरुणाने जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. नागपूरचा तरुण उद्योजक आणि ‘कॉस्मो’ (Kosmo) या AI स्टार्टअपचा संस्थापक हर्षल कांचन दीपक डोर्लीकर याने Googleच्या तांत्रिक भागीदारीत आयोजित ‘Build with Gemini XPRIZE’ स्पर्धेत ‘Education & Human Potential’ श्रेणीत अव्वल स्थान मिळवत ५० हजार अमेरिकी डॉलर (सुमारे ४८ लाख रुपये) इतका प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला.

जगभरातून २६ हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत ९० दिवसांत प्रत्यक्ष वापरकर्ते आणि कमाईसह व्यवसाय उभारण्याचे आव्हान देण्यात आले होते. विविध श्रेणींमध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या निवडक उपक्रमांमध्ये ‘कॉस्मो’चा समावेश झाला असून, या पुरस्काराने भारताच्या AI स्टार्टअप क्षेत्रातील नव्या क्षमतेचीही दखल घेतली आहे.

अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे आयोजित ‘Moonshots LIVE’ या भव्य कार्यक्रमात विजेत्यांची घोषणा करण्यात आली. XPRIZEचे संस्थापक डॉ. पीटर एच. डायमांडिस यांच्यासह तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Googleच्या Gemini AI मॉडेल्सवर आधारित ‘कॉस्मो’च्या माध्यमातून ChatGPT, Gemini आणि Claude यांसारख्या AI साधनांचा अधिक प्रभावी वापर करून तज्ज्ञ दर्जाचे परिणाम मिळविण्यास मदत केली जाते. नुकतीच हर्षलने २८० हून अधिक वापरकर्त्यांच्या अभिप्रायातून विकसित केलेली ‘कॉस्मो 1.2’ ही नवीन आवृत्तीही सादर केली आहे.

वडिलांच्या सेवेला मुलाच्या कर्तृत्वाची जोड

हर्षलचे वडील दीपक डोर्लीकर हे नागपूर रेल्वे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात (BDDS) ASI म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेसाठी २०२० मध्ये DGP सन्मानचिन्ह, तसेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती पोलीस पदकासाठीही त्यांचे नामांकन झाले आहे.

एका बाजूला देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत पिता, तर दुसऱ्या बाजूला AIच्या माध्यमातून जागतिक मंचावर नागपूरचे नाव उंचावणारा मुलगा—डोर्लीकर कुटुंबाच्या या दुहेरी कामगिरीने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More