संविधान चौकाच्या जागेला धक्का नको; काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचा मनपाला इशारा

– विधानभवन विस्तारीकरणाच्या मनपा जाहिरातीवर नोंदवला आक्षेप; आयुक्तांना निवेदन

The Exposer
नागपूर : विधानभवनाच्या विस्तारीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेने काढलेल्या जाहिरातीमुळे संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानंतरची आंदोलनांसाठी वापरली जाणारी जागा प्रशासनाच्या ताब्यात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने मनपा प्रशासनाकडे तीव्र आक्षेप नोंदवत संविधान चौकाची जागा कोणत्याही प्रकारे बाधित करू नये, अशी मागणी केली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे वरिष्ठ महासचिव दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त विपिन कुमार इटनकर यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले.

संविधान चौकाचे सामाजिक महत्त्व कायम ठेवण्याची मागणी

संविधान चौक हा नागपूरमधील विविध सामाजिक, लोकशाही आणि जनआंदोलनांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणाहून विविध संघटनांचे मोर्चे निघतात, आंदोलने केली जातात तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. त्यामुळे या जागेच्या वापरावर परिणाम करणारा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या भावना विचारात घ्याव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

विधानभवनाचे विस्तारीकरण आणि विकासकामांना विरोध नसल्याचे स्पष्ट करताना, विकासाच्या नावाखाली संविधान चौकाचे आंदोलन व सामाजिक कार्यक्रमांचे महत्त्वाचे ठिकाण बाधित होता कामा नये, अशी भूमिका काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने मांडली.

जाहिरातीमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची मागणी

महापालिकेच्या टेंडरमधील तरतुदींमुळे संविधान चौकाच्या जागेबाबत निर्माण झालेला संभ्रम प्रशासनाने तातडीने दूर करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. संविधान चौकाची विद्यमान जागा आणि तिचा सामाजिक वापर अबाधित राहणार असल्याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.

यावेळी शिष्टमंडळात प्रदेश उपाध्यक्ष राहुल घरडे, प्रदेश महासचिव प्रफुल्ल भाजे, प्रदेश सचिव राजेश रंगारी, प्रदेश सचिव रत्नदीप रंगारी, प्रदेश सचिव गुणवंत सोनटक्के, प्रदेश सचिव कपिल दामोदर, नगरसेवक सुहास नानवटकर, तसेच राजेश कांबळे, दिलीप खैरवार, अनिल पोराटकर, सिद्धार्थ थूल, लंकेश उके, जितेंद्र बोरकर आणि प्रफुल तागडे यांच्यासह काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More