– मनपाच्या जाहिरातीवरून संघर्षाची ठिणगी, आयुक्ताकडे नोंदविला आक्षेप
– आंदोलनाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न नको- शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुढडे
The Exposer
नागपूर : विधानभवनाच्या विस्तारासाठी नागपूर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी संविधान चौकाकडे जाणारा एक असलेला १८ मीटर रुंद आणि सुमारे ८० मीटर लांबीचा रस्ता बंद करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला आता शहर काँग्रेसनेही आक्षेप नोंदविला आहे. नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी मनपा आयुक्तांना पत्र देत या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

नागपूर महापालिकेने जाहिरात क्रमांक ४०७ PR, दिनांक २४ सप्टेंबर २०२६ अन्वये संबंधित रस्ता विधानभवनाच्या विस्तारासाठी बंद करण्याची सूचना प्रसिद्ध केली आहे. या सूचनेनुसार नागरिकांना आक्षेप नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या पत्रानुसार, संविधान चौक परिसरातील हा रस्ता केवळ वाहतुकीसाठी नसून नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, निदर्शने आणि लोकशाही मार्गाने आवाज उठविण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून अनेक वर्षांपासून वापरला जात आहे.
प्रफुल्ल गुडधे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, विधानभवन विस्ताराच्या नावाखाली नागरिकांच्या आंदोलनासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेवर परिणाम होणार असल्याने काँग्रेसचा या प्रस्तावाला तीव्र विरोध आहे. रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांच्या भावना आणि लोकशाही अधिकारांचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापालिकेच्या जाहिरातीत संबंधित रस्ता बंद करण्याबाबत सूचना देण्यात आली असून, आक्षेप असल्यास ठरावीक मुदतीत महापालिका मुख्यालयात लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संविधान चौकाच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
विधानभवन विस्तार आणि रस्ता बंद करण्याच्या प्रस्तावामुळे संविधान चौक परिसराच्या वापराबाबतचा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीही संविधान चौक हा नागरिकांच्या लोकशाही आंदोलनांचे केंद्र राहिला आहे. काँग्रेसच्या आक्षेपामुळे आता या प्रस्तावाला राजकीय पक्षाकडूनही औपचारिक विरोध नोंदविला गेला आहे. नागपुरातील काँग्रेसने यापूर्वीही संविधान चौकातून विविध जनआंदोलने केली आहेत.
महापालिकेच्या निर्णयाकडे आता लक्ष
एकीकडे विधानभवन विस्ताराचा प्रस्ताव, तर दुसरीकडे संविधान चौकातील नागरिकांच्या आंदोलनाच्या जागेचा प्रश्न, यामुळे महापालिका प्रशासन आता आक्षेपांवर काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















