– गुन्हेगारांची कुंडली तयार होणार; हयगय नाही, थेट धडक कारवाई — पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील
The Exposer
नागपूर : नागपुरातील वाढती लोकसंख्या, विस्तारत चाललेले शहर आणि बदलते गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेता आता शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला मुंबईच्या धर्तीवर नवा आयाम देण्यात येणार आहे. गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यासोबतच पोलिस यंत्रणांमध्ये माहितीची देवाणघेवाण अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे. गुन्हेगारी नियंत्रणासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन कारवाई केली जाईल आणि कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला.
गुरुवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई शहरात गुन्हेगारी नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचा अभ्यास करून त्यातील प्रभावी बाबी नागपुरात राबविण्यात येणार असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक कायम राहावा, तसेच गंभीर गुन्हे घडण्यापूर्वीच त्यांना प्रतिबंध करता यावा, यासाठी संशयित गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे.
छोटा गुन्हेगार मोठा गुन्हेगार होण्यापूर्वीच ‘ब्रेक’ नागपुरात छोटे गुन्हेगार भविष्यात मोठ्या गुन्हेगारीकडे वळू नयेत, यासाठी समुपदेशनासोबतच क्रिमिनल सायकॉलॉजीच्या माध्यमातून काम केले जात असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत असताना पोलिसांची संख्या मात्र त्या प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा अधिक प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे.
नागपुरातील सामाजिक सलोखा कायम असून इतर काही आयुक्तालयांच्या तुलनेत शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. अल्पवयीन गुन्हेगारांवरही पोलिसांचा ‘वॉच’ खून, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अल्पवयीन आरोपींच्या बाबतीतही कायद्यानुसार कठोर भूमिका घेतली जाणार आहे. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी समाज, आई-वडील आणि पालकांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.
अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केले जात आहे. ड्रग्ज, हुक्का आणि अमली पदार्थांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियावरील त्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात असून गुन्हेगारांच्या संपर्कात असलेल्या मुलांचा फॉलोअप घेण्यात येत आहे. महिला सुरक्षेसाठी १२ निर्भया पथके सज्ज महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. महिला सुरक्षेसाठी शहरात १२ निर्भया पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढविण्यासोबतच प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला जाणार आहे.
फुटपाथ अडवला तर थेट गुन्हा दाखल करण्याची तयारी शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही पोलिस आयुक्तांनी कठोर भूमिका स्पष्ट केली. आगामी काळात वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत. मनपा आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईला अधिक वेग देण्यात येणार आहे. फुटपाथवर दुकाने थाटून पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणारे किंवा वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वस्तू ठेवणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘ड्रग्ज फ्री नागपूर’साठी तस्कर-पेडलरवर धडक नागपुरातील ड्रग्ज विक्री आणि तस्करीची साखळी तोडण्यावर पोलिसांचा विशेष भर राहणार आहे. यासाठी एनडीपीएस पथकातील पोलिसांची संख्या वाढविण्याची तयारी सुरू आहे. युवा वर्गाला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तस्कर आणि पेडलरविरोधात कारवाईचा वेग वाढविण्यात येणार आहे. अवैध दारू आणि गांजा विक्री करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जात असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. सायबर गुन्हेगारांसाठीही पोलिसांची तयारी सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांचे वाढते स्वरूप लक्षात घेता या विभागात तज्ज्ञ मनुष्यबळाचा समावेश करण्यावर भर दिला जाणार आहे.
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम पोलिस यंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. एकूणच, मुंबईच्या धर्तीवर गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर, प्रतिबंधात्मक कारवाई, ड्रग्जविरोधी मोहीम, महिला सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि सायबर गुन्ह्यांवर तांत्रिक प्रहार—या माध्यमातून नागपूरच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक आक्रमक आणि सक्षम करण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















