१ नव्हे, २ नव्हे… एकाच वेळी ४ संशोधकांचा डंका; कोण आहेत हे ‘सुपर ४’?
The Exposer
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांना आपल्या ३ विद्यार्थ्यांसह स्टॅम्पोर्ड विद्यापीठाच्या जगातील टॉप २ टक्के संशोधकांच्या यादीत स्थान पटकावले आहे. डॉ. ढोबळे यांनी २०२० पासून सतत सातव्यांदा या आंतरराष्ट्रीय स्तरावर टॉप २ टक्के यादीत स्थान पटकावून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा गौरव वाढविला आहे. विद्यापीठातून सलग सातव्यांदा स्थान पटकावणारे ते एकमेव प्राध्यापक आहे.
याशिवाय डॉ. ढोबळे यांच्या मार्गदर्शनात पीएचडी प्राप्त करणारे तीन विद्यार्थी सुद्धा यावर्षी टॉप २ टक्के संशोधकांच्या यादीत स्थान पटकावून विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रात नवीन रेकॉर्ड निर्माण केला हे विशेष. यामध्ये डॉ. गोविंद नायर, सहाय्यक प्राध्यापक (संशोधक) क्रिष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (केआयकेटी) गाजियाबाद दिल्ली एनसीआर येथे कार्यरत आहे. डॉ.यातिश परोहा, सहाय्यक प्राध्यापक भौतिकशास्त्र विभाग रामदेव बाबा विद्यापीठ नागपूर तर डॉ. अभिजीत कदम, सहाय्यक प्राध्यापक भौतिकशास्त्र विभाग सी.एस.एम.एस.एस. छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत.
डॉ. ढोबळे हे आपल्या विद्यार्थ्यांसोबत कार्य करीत असताना संपूर्णपणे त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांचे संशोधन निबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित करीत नेहमीच एका उंचीवर घेऊन जातात. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी नेहमी चांगल्या पदावर कार्य करीत असतात. या तीनही विद्यार्थ्यांचे टॉप २ टक्के संशोधकांच्या यादीत नाव आल्याबद्दल त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले असल्याचे डॉ. ढोबळे यांनी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कार्यरत असलेले व सर्वांना परिचित असलेले संशोधक म्हणून नावारूपास आलेले डॉ. संजय ढोबळे हे सातव्यांदा तर त्यांचे तीन विद्यार्थी २ टक्केच्या यादीत आल्याबद्दल माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी सर्वांनी मेहनत करून विद्यापीठाला उंचीवर नेल्याची भावना व्यक्त केली.
संशोधक विद्यापीठात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा असल्याचे सांगितले. विद्यापीठ संशोधन क्षेत्रामध्ये नेहमीच चांगले कार्य करीत आहे, याची जाणीव असून चौघे ही संशोधक टाॅप दोन टक्के जागतिक यादीत आल्याबद्दल सर्वांचा अभिमान असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. विद्यापीठात प्रथमच डॉ. ढोबळे व त्यांची तीन विद्यार्थी टॉप दोन टक्के या यादीत आल्याबद्दल माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरु डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. विजय खंडाळ तसेच रामदेव बाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश पांडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहेत.
Author: प्रमोद गणवीर
पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर















