– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे विशेष निधीची मागणी
– केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त सहभागातून एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याचे साकडे
The Exposer
नागपूर : नागपुरातील संविधान चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा परिसराचा झिरो माईलपर्यंत विस्तार करून या संपूर्ण क्षेत्राचा राष्ट्रीय दर्जाचा विकास करण्यात यावा, अशी मागणी संविधान चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर विस्तारीकरण समितीने केली आहे. या मागणीसंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे निवेदन पाठवून विशेष निधी व प्रशासकीय सहकार्याची मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना उद्देशून निवेदन सादर करण्यात आले असून, तिन्ही मान्यवरांना ७ ऑक्टोबर २०२६ रोजी निवेदन पाठविण्यात आल्याची माहिती समितीने दिली. समितीचे मुख्य संयोजक तथा वरिष्ठ पत्रकार संतोष तायडे यांच्या पुढाकारातून हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. संविधानिक मूल्यांचे संवर्धन, सामाजिक न्यायाचा संदेश आणि लोकशाही मार्गाने जनभावना व्यक्त करण्यासाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांनी समन्वय साधून या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक आराखडा तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

संविधान चौकाला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त करून देण्याचा प्रयत्न
संविधान चौक हा सामाजिक न्याय, समता, लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जोडलेला महत्त्वाचा सार्वजनिक परिसर आहे. विविध सामाजिक आणि संविधानिक प्रश्नांवर येथे शांततापूर्ण आंदोलने, निदर्शने व लोकशाही मार्गाने जनभावना व्यक्त केल्या जातात. त्यामुळे या परिसराचा विकास केवळ सौंदर्यीकरणापुरता मर्यादित न ठेवता त्याला राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व प्राप्त करून देण्याची आवश्यकता समितीने निवेदनातून मांडली आहे.
या परिसराच्या जवळ भारतीय रिझर्व्ह बँक, ऐतिहासिक झिरो माईल आणि महाराष्ट्र विधान भवन यांसारखी महत्त्वाची स्थळे असल्याने संविधान चौक ते झिरो माईल या संपूर्ण क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रस्ताव आहे.
‘राष्ट्रीय संविधान प्रेरणा व लोकशाही अभिव्यक्ती केंद्र’ उभारण्याची मागणी
प्रस्तावित विकास आराखड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा परिसराचे विस्तारीकरण व सौंदर्यीकरण करण्यासोबतच ‘राष्ट्रीय संविधान प्रेरणा व लोकशाही अभिव्यक्ती केंद्र’ उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून भारतीय संविधान, सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्यांविषयी जनजागृती करण्याचा उद्देश आहे.
शांततापूर्ण आंदोलने आणि लोकशाही अभिव्यक्तीसाठी स्वतंत्र व पुरेशी जागा उपलब्ध करून देणे, नागरिकांसाठी प्रशस्त पदपथ, बैठक व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, पार्किंग आणि सुयोग्य वाहतूक व्यवस्था निर्माण करणे, तसेच दिव्यांगांसाठी अडथळामुक्त सुविधा विकसित करणे, या मागण्यांचाही प्रस्तावात समावेश आहे.
सरकारी जमिनींचे सर्वेक्षण करून उपलब्धतेचा विचार करा
या प्रकल्पासाठी भारतीय डाक विभाग, बीएसएनएल तसेच केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित विभागांच्या मालकीच्या जमिनींचे सर्वेक्षण करण्यात यावे. आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्यासाठी लागू कायदे व नियमांनुसार कार्यवाही करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
याशिवाय खासगी जमीन आवश्यक असल्यास ती परस्पर संमतीने खरेदी करणे, कायद्यानुसार योग्य मोबदला देऊन भूसंपादन करणे किंवा इतर वैधानिक पर्यायांचा विचार करण्याचे निवेदनात सुचविण्यात आले आहे.
विशेष निधीसाठी संयुक्त बैठक घेण्याची मागणी
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. पंतप्रधान कार्यालय, संबंधित केंद्रीय मंत्रालये, महाराष्ट्र शासन, नागपूर महानगरपालिका आणि समितीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक तातडीने आयोजित करून विकास आराखड्याला अंतिम स्वरूप द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच निवेदनावर झालेल्या कार्यवाहीची माहिती समितीला लेखी स्वरूपात देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग
या उपक्रमात मुख्य संयोजक संतोष तायडे यांच्यासह संयोजक ॲड. देवेंद्र यादव, प्रकाश कुंभे, प्रसिद्ध चित्रकार सुरेश मून, सुरेंद्रपाल सिंग, दिनेश शर्मा, जनार्दन मून, क्षितिज गायकवाड, संजय सहारे, रजत महेशगवळी, वृषभ राऊत, सोनू मंडपे आणि गणेश मथुरे यांचा समावेश आहे.
संविधान चौकाच्या विकासातून संविधानिक मूल्यांचा गौरव, सामाजिक न्यायाचा प्रसार आणि नागरिकांना अधिक चांगल्या सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा समितीचा प्रयत्न आहे. आता या प्रस्तावावर संबंधित यंत्रणा काय निर्णय घेतात आणि एकात्मिक विकास आराखड्याच्या दिशेने कोणती पावले उचलली जातात, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















