बंदुकीचा धाक, ४० लाखांच्या सोन्याची लूट अन् परराज्यात पलायन! सात दिवसांनी पोलिसांनी कसा लावला छडा?

– ३०० ते ४०० CCTV फुटेज तपासले; उत्तर प्रदेशातून चार संशयित ताब्यात, फॉर्च्युनर कारही जप्त

The Exposer
नागपूर : एका बाजूला बंदुकीसारख्या वस्तूचा धाक दाखवून सोन्या-चांदीच्या दुकानात लूट, दुसरीकडे गुन्ह्यानंतर परराज्यात पलायन! मात्र, शेकडो सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे नागपूर पोलिसांनी सात दिवसांच्या शोधमोहिमेनंतर संशयित आरोपींपर्यंत मजल मारली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा रोड परिसरात घडलेल्या या प्रकरणात चार संशयितांना उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली फॉर्च्युनर कारही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर दरोड्याच्या कटातील इतर साथीदार कोण, लुटलेल्या मुद्देमालाचे काय झाले आणि या टोळीचे आणखी काही गुन्ह्यांशी संबंध आहेत का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नेमकी घटना काय? अवघ्या १५ मिनिटांत लूट!

३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.४० ते ४.५५ वाजताच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा रोडवर, महाकाली बारसमोरील परिसरात ही घटना घडली. फिर्यादी राकेश सुभाष धोमणे (वय ३९) यांचे गजानन नगर परिसरात सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीचे दुकान आहे.

दुकानात काम करणारा शुभम खेमराज हाडो (वय २४) उपस्थित असताना चार अनोळखी इसम दुकानात शिरले. त्यांनी बंदुकीसारख्या दिसणाऱ्या वस्तूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि सुमारे ३५० ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे ४० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून पलायन केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेज; तपासाची चक्रे वेगाने फिरली

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. परिसरातील ३०० ते ४०० सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. तांत्रिक माहिती आणि परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढण्याचा प्रयत्न झाला.

तपासाचे धागेदोरे परराज्यात पोहोचताच पोलिसांची दोन पथके उत्तर प्रदेश आणि हरियाणाकडे रवाना झाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला. सात दिवसांच्या तपासानंतर उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून चार संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

उत्तर प्रदेशातून चार संशयित ताब्यात

या कारवाईत अटक करण्यात आलेल्यामध्ये आरोपी अभिषेकसिंग ठाकूर — बरेली, उत्तर प्रदेश, जयराम ऊर्फ जोगिंदर अशोकसिंग ठाकूर — वय १९ वर्षे, शुभांकित निलेशकुमार चतुर्वेदी — वय २२ वर्षे, नोएडा, उत्तर प्रदेश, राजन सामी शर्मा — वय २२ वर्षे, रा. मेरठ, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. तर त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

फॉर्च्युनर कार जप्त; आणखी कोणते धागेदोरे हाती लागणार?

तपासादरम्यान गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली फॉर्च्युनर कार (क्रमांक एमएच ४९ बीव्ही ११९१) जप्त करण्यात आली आहे. संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, लुटलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट आणि इतर संभाव्य साथीदारांची भूमिका यांचा तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कामगिरी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक चेतन बोरखडे तसेच पोलीस कर्मचारी नितीन चुलपार, राजाराम जाधव, विवेक झिंगरे, अर्जुन यादव, कमलेश गणोर, मनोज टेकाम, प्रितम यादव, रितेश तुमडाम, योगेश वासनिक, महेंद्र सडमाके, नितीन वासनिक, चंद्रशेखर रघोतें, अनंता क्षीरसागर, पराग ढोक, रोशन तिवारी, नितीन वर्मा, कमलेश गहलोद, संदीप पांडे, सुधीर पवार, कुणाल गोडाम, धिरज पंचभावे, मिथुन नाईक, चैतन्य, परमेश्वर, आशिष धंदरे आणि अजमत शेख यांनी केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More