अखेर २० वर्षांच्या तपश्चर्येला यश! ‘मानव कल्याण अभ्यासिके’चे धम्मचक्र प्रवर्तन दिनी लोकार्पण

– शताब्दी नगरातील एन.आय.टी. परिसरात ज्ञानाचा नवा दीप प्रज्वलित; भदंत प्रियदर्शी महाथेरो यांच्या हस्ते उद्घाटन

The Exposer
नागपूर : गेल्या वीस वर्षांपासून पाहिलेले स्वप्न, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समाजहिताची तळमळ यांना अखेर यश आले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन पर्वावर शताब्दी नगर येथील एन.आय.टी. परिसरात ‘मानव कल्याण अभ्यासिके’चे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थी, अभ्यासक आणि ज्ञानप्रेमींना अभ्यासासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात पंचशील ध्वजारोहणाने झाली. भदंत प्रियदर्शी महाथेरो यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते अभ्यासिकेची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ज्ञान, शिक्षण, समता आणि मानवकल्याणाचा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.

वीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नांनंतर साकारलेल्या या अभ्यासिकेमुळे समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळेल, तसेच वाचन, चिंतन आणि बौद्धिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला बौद्ध विचारवंत राम घोडेस्वार, ऑल इंडिया समता सैनिक दलाचे हरेश्वर चहांदे, माजी मुख्य अभियंता प्रकाश भोतमांगे, बुद्धिस्ट स्टडीचे सुभाष बोंधाटे, बौद्ध उपासिका जोहार आई कांबळे, शाक्यसिंह संस्थेच्या स्मिता वासेकर, समता बुद्ध विहारचे दिलीप पाटील, अभियंता सुरेश खांडेकर आणि राष्ट्रीय संरक्षक वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानव कल्याण संस्थेच्या संगीता म्हैस्कर यांच्यासह माला वाघमारे, उज्वला डोंगरे, संध्या चौरे, माधुरी रामटेके, अपूर्वा वाळके, सुनीता पारखंडे, आनंद कोचे, वच्छला वाळके, शंकर पारखंडे, प्रशांत नाईक, मिलिंद रामटेके, कुणाल मोडक, रमेश डोंगरे, निकिता थुलकर, अपूर्वा नागदेवे, सरस्वती तेलमोरे, योगेश्री खांडेकर, आशा कोचे, भावना मुन, वैशाली नाईक, कविता रामटेके आणि हुमने ताई यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट

वीस वर्षांच्या अथक प्रयत्नांतून साकारलेली मानव कल्याण अभ्यासिका ही केवळ अभ्यासाची जागा नसून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरण्याची अपेक्षा आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने सुरू झालेल्या या उपक्रमातून ज्ञानाचा प्रसार आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More