– PIT-NDPS कायद्यांतर्गत नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; लकडगंजमधील ३२ वर्षीय आरोपीला स्थानबद्धतेचे आदेश
The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमित उर्फ ‘नमो’ बंडू मेश्राम (वय ३२) रा. स्वीपर कॉलनी, गंगाबाई घाट, याच्याविरुद्ध PIT-NDPS कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्याला एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी जारी केले.
अमली पदार्थांच्या अवैध व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी असलेल्या Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988 (PIT-NDPS) या कायद्यातील कलम ३(१) अन्वये ही कारवाई करण्यात आली. संबंधित कायदेशीर निकष पूर्ण झाल्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशाने स्थानबद्धतेची कारवाई केली जाते. या आदेशानुसार सुमित उर्फ ‘नमो’ मेश्राम याला एक वर्षासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उपायुक्त (परिमंडळ-३), पोलीस उपायुक्त (गुन्हे), तसेच संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पैदलवार, त्यांची टीम आणि लकडगंज पोलीस ठाण्यातील एम.ओ.बी. पथकाच्या पोलीस कर्मचारी मंजुषा मेश्राम व भावना घोडके यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
अमली पदार्थ विक्रेतांनो, सावधान!
गांजा, चरस, एमडी ड्रग्ज आणि इतर मादक पदार्थांची अवैध खरेदी-विक्री, साठवणूक, वाहतूक व तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश नागपूर शहर पोलिसांनी दिला आहे. नियमित गुन्हे दाखल करण्यासोबतच, कायदेशीर अटी पूर्ण होत असल्यास PIT-NDPS कायद्यांतर्गत स्थानबद्धतेसारख्या उपायांचाही अवलंब केला जाऊ शकतो.
नागरिकांनीही पुढाकार घ्यावा
अमली पदार्थांचा अवैध व्यापार हा समाजाच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसमोरील गंभीर प्रश्न आहे. नागरिकांनी अशा व्यवहारांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला किंवा पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
“अमली पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अमली पदार्थमुक्त, सुरक्षित आणि निरोगी नागपूर घडविण्यासाठी नागपूर शहर पोलीस कटिबद्ध आहेत,” असा संदेश पोलिसांनी दिला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















