नागपूर विद्यापीठाच्या प्रा. प्रमोद रामटेके यांची जागतिक भरारी!

– जगातील अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान; संशोधनाला २३ हजारांहून अधिक सायटेशन्स
– ‘द लॅन्सेट’मधील जागतिक आरोग्य संशोधनात मोलाचे योगदान; ४६ वर्षांच्या संशोधन प्रवासाचा आंतरराष्ट्रीय गौरव

The Exposer
नागपूर : जागतिक दर्जाच्या संशोधन क्षेत्रात नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग विभागातील प्रा. प्रमोद वासुदेव रामटेके यांचा जगातील अव्वल दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हियर यांनी जाहीर केलेल्या २०२६ च्या या जागतिक यादीतील स्थानामुळे त्यांच्या प्रदीर्घ संशोधनकार्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.

प्रा. रामटेके यांच्या संशोधनाला गुगल स्कॉलरवर आतापर्यंत २३,३२३ सायटेशन्स मिळाले असून, त्यांचा एच-इंडेक्स ६० आणि आय-१० इंडेक्स २१६ आहे. विशेष म्हणजे, त्यांना मिळालेल्या सायटेशन्सपैकी १७,८०० हून अधिक सायटेशन्स २०२१ नंतरच्या काळातील आहेत. संशोधनाचा वाढता प्रभाव आणि जागतिक वैज्ञानिक समुदायाकडून मिळणारी दखल यामुळे त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित होते.

‘द लॅन्सेट’मधील संशोधनाला जागतिक दाद

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन (IHME) संस्थेच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ या आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पात प्रा. रामटेके सहयोगी संशोधक म्हणून कार्यरत आहेत. जगभरातील हजारो शास्त्रज्ञांचा सहभाग असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक आरोग्यविषयक आव्हाने आणि त्यांचे परिणाम यांचा अभ्यास केला जातो.

जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिक ‘द लॅन्सेट’मध्ये २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या दोन महत्त्वपूर्ण संशोधनपत्रांमध्ये त्यांचे योगदान आहे. यापैकी प्रतिजैविक प्रतिरोधाचा १९९० ते २०२१ या कालावधीतील जागतिक भार आणि २०५० पर्यंतच्या संभाव्य स्थितीचा अंदाज मांडणाऱ्या संशोधनपत्राला ५,४५० हून अधिक सायटेशन्स मिळाले आहेत. तर २०४ देशांतील ८८ आरोग्य जोखीम घटकांच्या जागतिक परिणामांचा अभ्यास करणाऱ्या दुसऱ्या संशोधनपत्राला ३,२८० हून अधिक सायटेशन्स मिळाले आहेत. या दोन्ही संशोधनपत्रांना मिळून सुमारे ८,७०० सायटेशन्स मिळाले आहेत.

४६ वर्षांचा संशोधन प्रवास; शेकडो शोधनिबंध

मूळचे यवतमाळचे असलेले प्रा. रामटेके हे नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना संशोधन क्षेत्रातील ४६ वर्षांहून अधिक अनुभव आहे. लखनौ येथील भारतीय विषविज्ञान संशोधन संस्थेत (IITR) शास्त्रज्ञ म्हणून काम केल्यानंतर त्यांनी प्रयागराज येथील सॅम हिगिनबॉटम कृषी, तंत्रज्ञान व विज्ञान विद्यापीठात जैवतंत्रज्ञानाचे प्राध्यापक, जैविक विज्ञान विभागप्रमुख आणि पदव्युत्तर अभ्यास अधिष्ठाता अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. सध्या ते या विद्यापीठात प्रोफेसर एमेरिटस म्हणून कार्यरत आहेत. अंटार्क्टिकाला गेलेल्या १८व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेचेही ते सदस्य होते.

&nउपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, शाश्वत शेतीसाठी वनस्पतींच्या वाढीस चालना देणारे सूक्ष्मजीव (PGPR), नॅनोतंत्रज्ञान, नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग आणि एन्झायमॉलॉजी हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. त्यांच्या नावावर २५० हून अधिक संशोधन लेख, तीन पेटंट आणि धानाचे एक जननद्रव्य आहे. त्यांनी NCBI मध्ये ३५० हून अधिक जनुक अनुक्रम नोंदवले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे.

राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमी (NAAS), लिनियन सोसायटी ऑफ लंडन आणि रॉयल सोसायटी ऑफ बायोलॉजी यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचे फेलो म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली आहे. जे. सी. बोस सुवर्णपदक आणि बीएचयू शताब्दी पुरस्कारासह अनेक सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. जागतिक संशोधनात नागपूरचे नाव उंचावणाऱ्या प्रा. रामटेके यांच्या या यशाबद्दल नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More