– महाबोधी महाविहार प्रकरणाची न्यायालयीन स्थिती अनुयायांसमोर मांडणार; सोमवारी आंतरराष्ट्रीय धम्म परिषद
– भदंत सुरेई ससाई यांची माहिती; १९ व २० ऑक्टोबरला विविध धार्मिक आणि वैचारिक कार्यक्रम
The Exposer
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देणारा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर पार पडणार आहे. यानिमित्त १९ आणि २० ऑक्टोबर असे दोन दिवस विविध धार्मिक, सामाजिक आणि वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्यात महाबोधी महाविहार प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सद्यस्थितीची माहिती अनुयायांना दिली जाणार असून, दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचाही आढावा मांडण्यात येणार आहे.

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेनानायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी ही माहिती दिली. मुख्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भदंत ससाई राहणार असून, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अॅड. शैलेश नारनवरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. म्यानमारचे भदंत वन्ना सिरी महाथेरो, दिल्लीचे भंते करुणाकरण आणि बेंगळुरूचे जिग्मे सुल्ट्रीम महाथेरो यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
महाबोधी महाविहार प्रकरणावर महत्त्वपूर्ण माहिती
महाबोधी महाविहारासंबंधीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणाची बाजू मांडणारे अधिवक्ता अॅड. शैलेश नारनवरे मुख्य सोहळ्यात उपस्थित अनुयायांना न्यायालयीन प्रकरणाची सद्यस्थिती, आतापर्यंतची प्रक्रिया आणि पुढील संभाव्य न्यायालयीन टप्प्यांची माहिती देणार आहेत. त्यामुळे महाबोधी महाविहाराच्या प्रश्नावर सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत अनुयायांना थेट माहिती मिळणार आहे.
याशिवाय नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या सौंदर्यीकरणाच्या कामाची माहितीही यावेळी दिली जाणार असल्याचे भदंत ससाई यांनी स्पष्ट केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी देश-विदेशातून लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. यंदाही तथागत गौतम बुद्धांचा धम्मसंदेश, समता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी आंतरराष्ट्रीय धम्म परिषद
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमांची सुरुवात सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मध्वजारोहणाने होईल. त्यानंतर बुद्धवंदना होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता दीक्षाभूमीवर आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातील भिक्खूंच्या उपस्थितीत या परिषदेत बुद्ध धम्माचे विविध पैलू, तथागत गौतम बुद्धांचा मानवतावादी संदेश आणि वर्तमान काळातील धम्माची प्रासंगिकता यावर विचारमंथन होणार आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमांतून धम्मक्रांतीचा इतिहास, बुद्धविचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















