– परस्परविरोधी भूमिकेवर प्रश्नचिन्ह; आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी!
The Exposer
नागपूर : शहरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघातर्गत येत असलेल्या रिंग रोडवरील शताब्दी चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य म्युरल वॉल आर्ट उभारून चौकाचे सुशोभीकरण करण्याच्या मागणीवरून आमदार अभिजित वंजारी यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. आमदार स्थानिक विकास निधीतून दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शविल्याचा दावा संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असतानाच, त्यानंतर संबंधित कामासाठी निधी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे पत्र त्यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्तांना पाठविल्याचे समोर आले आहे.
आ. वंजारी यांच्या या परस्परविरोधी वाटणाऱ्या भूमिकेमुळे आंबेडकरी सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, निधी देण्याची तयारी दर्शविल्यानंतर भूमिका बदलण्यामागचे नेमके कारण काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
२७ जून रोजी स्मारक समितीचे निवेदन
परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक स्मारक समितीच्या वतीने २७ जून २०२६ रोजी आमदार अभिजित वंजारी यांना निवेदन देण्यात आले होते. शताब्दी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य म्युरल वॉल आर्ट उभारणे, चौकाचे सुशोभीकरण करणे, प्रकाशयोजना व हरितीकरण करणे, तसेच नागरिकांसाठी आवश्यक सुविधा विकसित करणे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या होत्या.
समितीच्या मते, हा प्रश्न केवळ चौकाच्या सौंदर्यीकरणापुरता मर्यादित नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या महत्त्वपूर्ण स्थळाला ऐतिहासिक महत्त्वाला साजेसे स्वरूप देण्याशी संबंधित आहे.
दोन तास प्रतीक्षा; दोन लाखांच्या निधीची तयारी
आंबेडकरी सामाजिक कार्यकर्ते पंकज थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वेळ घेऊन आमदार अभिजित वंजारी यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या शिष्टमंडळात आंबेडकरी सामाजिक कार्यकर्ते संतोष तायडे, काँग्रेस कार्यकर्ते सोनू मंडपे आणि अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी आमदार वंजारी यांनी लवकर येण्याचे आश्वासन दिल्यानंतरही त्यांना सुमारे दोन तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर आमदारांनी निवेदन स्वीकारले आणि आमदार स्थानिक विकास निधीतून दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली.
मात्र, त्यानंतर संबंधित कामासाठी निधी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे पत्र महानगरपालिका आयुक्तांना पाठविण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भेटीदरम्यान निधी देण्याची तयारी दर्शविली असेल, तर नंतर नेमकी कोणती अडचण निर्माण झाली? याबाबत मनपा आयुक्तांना पत्र न पाठवता स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांपुढे मांडून त्यांचे मार्गदर्शनातून समाधान करता आले असते.
आयुक्तांना पत्र; निधी देणे शक्य नसल्याचे नमूद

उपलब्ध पत्रातील माहितीनुसार, आमदार अभिजित वंजारी यांनी २७ जून २०२६ रोजी नागपूर महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठविले. पत्राचा संदर्भ क्रमांक जा.क्र. वि.प.स./७४३/२०२६ असा आहे. या पत्रात आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संबंधित काम अनुज्ञेय नसल्यामुळे त्यासाठी निधी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
निधी देण्याची तयारी दर्शविल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आणि त्यानंतर नियमांचा संदर्भ देत निधी देता येत नसल्याचे पत्र पाठविल्याची बाब यामुळे चर्चेत आली आहे. संबंधित कामासाठी निधी उपलब्ध होऊ शकत नसल्याचे अधिकृत कारण नियमांशी संबंधित असल्याचे पत्रात नमूद असल्याचे दिसते.
निवेदनात त्रुटी होत्या, तर पर्यायी मार्ग का सुचविला नाही?
संबंधित कामासाठी आमदार स्थानिक विकास निधी वापरणे नियमांनुसार शक्य नसेल, तर त्याबाबत निवेदन स्वीकारतानाच स्पष्ट माहिती देता आली असती. निवेदनात तांत्रिक त्रुटी किंवा आवश्यक बाबींची कमतरता असल्यास त्या समितीच्या निदर्शनास आणून देऊन सुधारित निवेदन सादर करण्यास सांगता आले असते, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांकडून मांडली जात आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पाठपुरावा करण्यासाठी सिव्हिल लाईन स्थिती मनपा कार्यालयात गेले असता आ. अभिजित वंजारी यांचे पत्र त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला आणि काँग्रेसचे आ. वंजारी यांच्यावर असलेल्या विश्वासाला तडा गेली. ही बाब लक्षात घेता आ. वंजारी यांनी गेल्या पाच वर्षात पदवीधरांसाठी आमदार निधीतून केलेल्या कामांची अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.
आ. वंजारी यांनी आमदार निधी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करतानाच संबंधित कामासाठी कोणत्या पर्यायी निधीतून किंवा शासकीय योजनेतून मदत मिळू शकते, याबाबत आ. वंजारी यांच्याकडून मार्गदर्शन अपेक्षित होते, असेही सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
निधीच्या नियमांचा अडसर की पर्यायी मार्ग शोधण्याची गरज?
शताब्दी चौक हा सामाजिक आणि संविधानवादी विचारांच्या दृष्टीने महत्त्वाचा परिसर आहे. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य म्युरल वॉल आर्ट उभारणे, प्रकाशयोजना करणे आणि चौकाचे सुशोभीकरण करणे, ही मागणी समितीने पुढे आणली आहे. आमदार स्थानिक विकास निधीतून संबंधित काम करता येत नसेल, तर नागपूर महानगरपालिका, पात्र शासकीय योजना किंवा अन्य वैध निधीच्या माध्यमातून हा प्रस्ताव पुढे नेता येईल का, याचा विचार करण्याची गरज असल्याचे कार्यकर्ते सांगतात.
लोकप्रतिनिधींकडून केवळ निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा नसून, सार्वजनिक हिताच्या मागणीसाठी व्यवहार्य पर्याय शोधून देण्याचीही अपेक्षा असते. त्यामुळे या प्रकरणात निधी नाकारण्याच्या कारणासोबतच चौकाच्या विकासासाठी पुढे कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात, याबाबत स्पष्टता आ. अभिजित वंजारी यांनी करणे आवश्यक होते. मात्र असे न करता त्यांनी थेट मनपा आयुक्तांना पत्र देणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
पंकज थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ
या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पंकज थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार वंजारी यांची भेट घेतली होती. थोरात हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते असून, त्यांनी जोगीनगर परिसरातून काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा महानगरपालिका निवडणूक लढविली आहे. पक्षातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते संतोष तायडे, काँग्रेस कार्यकर्ते सोनू मंडपे आणि अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
&nbसार्वजनिक हिताच्या मागणीवर निर्णय घेताना संबंधित कार्यकर्त्यांशी स्पष्ट संवाद साधणे, निधी देणे शक्य नसल्यास त्याची कारणे समजावून सांगणे आणि पर्यायी मार्ग सुचविणे आवश्यक होते, अशी भूमिका समितीशी संबंधित कार्यकर्ते मांडत आहेत.
बाबासाहेबांचे नाव केवळ राजकीय भाषणांपुरते मर्यादित राहू नये!
या प्रकरणामुळे आमदार अभिजित वंजारी यांच्या भूमिकेबाबत आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शताब्दी चौकाच्या विकासासाठी निधी देण्याची तयारी दर्शविल्याचा दावा असताना, नंतर निधी उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे पत्र मनपा आयुक्तांना का पाठविण्यात आले, याबाबत आमदारांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे. दुसरीकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आणि विचार केवळ राजकीय भाषणांपुरते मर्यादित न राहता त्यांच्या स्मारकांच्या विकासासारख्या प्रत्यक्ष सार्वजनिक कामांतूनही प्रतिबिंबित व्हावेत, अशी अपेक्षा आंबेडकरी सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















