बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला ७० वर्षे; दीक्षाभूमी सजली, अनुयायी दाखल

धम्मभूमीत आज विचारांचा महासोहळा; दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी

The Exposer
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नागपूरची दीक्षाभूमी पुन्हा एकदा देशभरातील अनुयायांनी गजबजली आहे. ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाराष्ट्रासह विविध राज्यांतून मोठ्या संख्येने नागरिक नागपुरात दाखल झाले असून, परिसरात दिवसभर अनुयायांची वर्दळ पाहायला मिळत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी याच भूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या कार्यक्रमासाठीही दीक्षाभूमी परिसरात विविध भागांतून येणाऱ्या अनुयायांची संख्या वाढत आहे.

पायी येणाऱ्यांचीही मोठी संख्या
नागपूर शहरातील विविध मार्गांवरून अनुयायी दीक्षाभूमीकडे येत आहेत. काही अनुयायी कुटुंबासह तर काही समूहाने शहरात दाखल झाले आहेत. दीक्षाभूमी परिसरात बौद्ध साहित्य, धम्मविषयक पुस्तके आणि विविध सामाजिक उपक्रमांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक नियोजनावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

मुख्य सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आज दीक्षाभूमीवर होणार आहे. देश-विदेशातील बौद्ध अनुयायी, भिक्खू संघ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. धम्मविचार, सामाजिक समता आणि बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी विचारांचा संदेश या निमित्ताने दिला जाणार आहे.  दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक अनुयायाला आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांकडून समन्वयाने काम केले जात आहे. त्यामुळे यंदाचा धम्मचक्र प्रवर्तन दिनही नागपूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रमोद गणवीर
Author: प्रमोद गणवीर

पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर

Leave a Comment

Read More