भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा त्रिवेणी संगम! माँ तुळजा भवानी देवस्थानाचा नवरात्र उत्सव उत्साहात संपन्न

– मोफत आरोग्य तपासणी, औषधवाटप अन् शासकीय योजनांचा लाभ; शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

The Exposer
नागपूर : भक्तीमय वातावरण, धार्मिक उत्साह आणि सामाजिक सेवेचा संदेश देत मनीष नगर येथील माँ तुळजा भवानी देवस्थानाचा अश्विन शारदीय नवरात्र उत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसह उत्साहात संपन्न झाला. देवीच्या दर्शनासोबतच आरोग्य सेवा, गरजूंना साहित्य वाटप आणि शासकीय योजनांचा लाभ भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम हे या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.

नवरात्रोत्सवानिमित्त देवस्थानात प्रज्वलित करण्यात आलेल्या मनोकामना अखंड ज्योतीचे विधिवत विसर्जन करून उत्सवाची सांगता करण्यात आली. यानंतर आयोजित भव्य महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. संपूर्ण नवरात्र काळात देवस्थानात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आरोग्य तपासणी शिबिरातून शेकडो भाविकांना दिलासा

धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत देवस्थान ट्रस्टतर्फे विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शहरातील नामांकित रुग्णालयांतील डॉक्टरांनी या शिबिरात सहभाग घेत शेकडो भाविकांची आरोग्य तपासणी केली. यावेळी गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष उपक्रम

दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

एसटी बस सवलत पास, आधार कार्ड, आयुष्मान कार्ड, ई-श्रम कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, महिला घरेलू कामगार नोंदणी तसेच श्रावणबाळ आणि निराधार योजनांसंदर्भातील सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामुळे अनेक नागरिकांना आवश्यक कागदपत्रे आणि शासकीय योजनांशी संबंधित कामांसाठी मार्गदर्शन व मदत मिळाली.

प्रवीण शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन

माँ तुळजा भवानी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण बालमुकुंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उत्सव यशस्वी करण्यासाठी लता बालमुकुंद शर्मा, सचिन शर्मा, राकेश बोकडे, राजकुमार अग्रवाल, जगदीश गुप्ता, नेहा अम्मा, मो. शहाबुद्दीन, विनोद वासाने, देवेंद्र ठाकरे, विकास महाजन, विवेक गोडबोले, विवेक दस्तुरे, उषा धुर्वे, दुर्गा कोसारे, महिमा शर्मा यांच्यासह अन्य देवीभक्तांनी विशेष परिश्रम घेतले. धार्मिक श्रद्धेसोबतच आरोग्य सेवा, गरजूंची मदत आणि शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देत हा नवरात्र उत्सव भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More