– पोलिसांकडून शासकीय जागेवरील कथित अनियमिततेची चौकशी सुरू असतानाच कंपाउंडभोवती उंच टिनाचे पत्रे
– प्रेस क्लब संचालकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, तातडीने स्थळपाहणी करून बांधकाम परवानग्यांची पडताळणी करण्याची मागणी
The Exposer
नागपूर : शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील पत्रकार क्लब ऑफ नागपूर या कंपनीच्या ताब्यात असलेल्या शासकीय स्वाती बंगला क्र. ६४/१ आणि त्यास संलग्न जागेवरील कथित बांधकामाच्या हालचालींमुळे नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित जागेवरील हक्क, विकास कराराची वैधता, बांधकामाचा मंजूर नकाशा आणि अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत पडताळणी करण्याची मागणी माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि नागपूर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाकडे निवेदन सादर केले आहे.
बांधकाम सुरू होण्यापूर्वीच प्रशासन जागे होणार का?
मून यांच्या निवेदनानुसार, या प्रकरणी माझ्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. नुकतेच पोलिसांनी माझे बयान नोंदवून घेतले आहे. असे असतांना २२ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वाती बंगल्याच्या कंपाउंडच्या भिंतीभोवती उंच टिनाचे पत्रे लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संबंधित जागेवर बांधकामपूर्व तयारी सुरू आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांकडून गैरअर्जदार प्रेस क्लबच्या 9 संचालकांचे बयान व चौकशी पूर्ण होण्यापूर्वी घटनास्थळात करण्यात येत असलेला बदल हा गैरकायदेशीर आहे. पोलिस चौकशी सुरु असतांना गैरअर्जदार हे घटनास्थळ बदलविण्याची घाई का करीत आहे, असा प्रश्न माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष स्थळपाहणी आणि अधिकृत कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.
मनपा अग्निशमन NOC बाबत गंभीर प्रश्न
पत्रकार क्लब ऑफ नागपूरच्या इमारतीच्या बांधकामासाठी मनपा अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याबाबत २१ सप्टेंबर २०२६ रोजीचे पत्र असल्याचा संदर्भ निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पासाठी आवश्यक अग्निसुरक्षा मंजुरी घेण्यात आली आहे की नाही, याची अधिकृत तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंजूर नकाशा नेमका कुठे आहे?
नगर रचना विभागातील सहाय्यक नगर रचनाकार श्री. कापसे यांनी ऑनलाइन प्रणाली तपासून संबंधित प्रकल्पाचा बांधकाम नकाशा मंजूर नसल्याची माहिती दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पाच्या मंजूर नकाशाची आणि बांधकाम परवानगीची अधिकृत स्थिती स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पोलीस तक्रारींच्या चौकशीकडेही लक्ष
स्वाती बंगल्याशी संबंधित जागेच्या प्रक्रियेत कथित फसवणूक किंवा शासनाची दिशाभूल झाली आहे का, याची चौकशी करण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे मून यांनी नमूद केले आहे. त्यानंतर २५ सप्टेंबर २०२६ रोजी पूरक तक्रारही दाखल करण्यात आली. पहिली तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आणि मानहानीच्या आरोपांमुळे मानसिक त्रास होत असल्याचा दावाही पूरक तक्रारीत केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या तक्रारींच्या चौकशीबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त, सीताबर्डी विभाग यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र दिल्याचा संदर्भही देण्यात आला आहे. संबंधित आरोपांची सत्यता आणि जागेसंदर्भातील कागदपत्रांची वैधता याबाबत अधिकृत निष्कर्षाची प्रतीक्षा असल्याचे निवेदनातून स्पष्ट होते.
मून यांच्या प्रमुख मागण्या काय?
स्वाती बंगला परिसराची तातडीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी, बांधकाम नकाशा, बांधकाम परवानगी आणि विकास परवानगीची पडताळणी करावी.,अग्निशमन विभागाच्या NOC ची अधिकृत स्थिती स्पष्ट करावी.
जागेची मालकी, शासकीय मालमत्तेचे स्वरूप आणि विकास कराराची वैधता तपासावी, आवश्यक परवानग्यांशिवाय किंवा मंजूर नकाशाच्या विरोधात काम सुरू असल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी., पोलीस तक्रारींच्या चौकशीची सद्यस्थिती आणि तक्रारदाराच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करावी, केलेल्या कारवाईचा अहवाल लेखी स्वरूपात द्यावा.
आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
शासकीय जागेचा वापर, बांधकामविषयक परवानग्या आणि सार्वजनिक हिताशी संबंधित या प्रकरणात संबंधित विभागांनी कागदपत्रांच्या आधारे वस्तुस्थिती स्पष्ट करणे महत्त्वाचे ठरणार आहे. बांधकाम परवानगी किंवा अग्निशमन NOC नसल्याचे अधिकृतरीत्या सिद्ध झाल्यास लागू नियमांनुसार पुढील कारवाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
संबंधित विभागांची भूमिका आणि चौकशीचा निष्कर्ष समोर आल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल. जनार्दन मून यांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
— The Exposer
Author: संतोष तायडे
संपादक















