पदवीधर निवडणुकीत कराळे मास्तरांची धुवाधार बॅटिंग; अनिल सोलेंच्या भूमिकेनेही वाढवली राजकीय धाकधूक!

– अभिजित वंजारी विरुद्ध सुधाकर कोहळे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई; अपक्ष नितेश कराळेंच्या प्रभावाची चर्चा, मतविभाजनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

The Exposer
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी मतदान पार पडले. काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई रंगली असताना, अपक्ष उमेदवार मास्तर नितेश कराळे यांनीही आज धुवाधार बॅटिंग केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या भूमिकेमुळे मोठ्याप्रमाणात राजकीय धाकधूक वाढली आहे.

निवडणुकीच्या मैदानात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांनीही आपापली ताकद पणाला लावली. त्यामुळे ही निवडणूक केवळ काँग्रेस आणि भाजप यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई न राहता, पदवीधर मतदारांचा कल कोणत्या दिशेने जातो, याची परीक्षा ठरली आहे.

कराळे मास्तरांची आक्रमक शैली चर्चेत

मास्तर नितेश कराळे यांनी आपल्या स्वतंत्र शैलीतून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, बेरोजगारी, सुशिक्षित तरुणांचे प्रश्न आणि पदवीधरांना भेडसावणाऱ्या अडचणी यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचे त्यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे.

राजकीय पक्षांच्या संघटनात्मक ताकदीसमोर अपक्ष उमेदवारांना मर्यादा असल्या, तरी जनसंपर्क, वैयक्तिक लोकप्रियता आणि स्थानिक प्रश्नांवरील भूमिका यांच्या जोरावर ते मतदारांचे लक्ष वेधू शकतात. मतदानाच्या 16 तासा आधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने कराळे मास्तर यांचे केलेले पक्षातून निलंबन हे त्यांना अधिक चर्चेत आणण्यासह शेवटच्या मतदारांपर्यन्त पोहचण्यासाठी कारण ठरल्याचे म्हटले जाते.

अनिल सोले यांच्या भूमिकेकडेही लक्ष

भाजपचे माजी विधान परिषद सदस्य प्रा. अनिल सोले यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी कोहळे यांच्या समर्थनार्थ माघार घेतली; मात्र माघारीची मुदत संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम राहिले. त्यामुळे प्रा. अनिल सोले यांच्या भूमिकेने राजकीय धाकधूक वाढवली आहे.

वंजारी आणि कोहळे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई

काँग्रेसचे अभिजित वंजारी हे विद्यमान विधान परिषद सदस्य असून, त्यांच्यासाठी ही निवडणूक आपले प्रतिनिधित्व कायम राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. दुसरीकडे, भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देत मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जोर लावला. भाजपच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सहभागामुळे निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. काँग्रेसनेही वंजारी यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पक्षांसाठी ही लढत केवळ एका विधान परिषद जागेपुरती मर्यादित नसून, वरिष्ठ नेत्यांचा विदर्भातील राजकीय प्रभाव आणि ताकदीची चाचणी मानली जात आहे.

सहा जिल्ह्यांतील मतदारांचा कौल निर्णायक

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागपूर शहरातील राजकीय वातावरणाबरोबरच ग्रामीण भागातील पदवीधर मतदारांचा कलही निकालासाठी निर्णायक ठरणार आहे. बेरोजगारी, शिक्षणव्यवस्था, सरकारी नोकऱ्यांमधील संधी, कौशल्यविकास आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर कोणता उमेदवार अधिक प्रभावी ठरला, याचे प्रतिबिंब मतदानातून उमटण्याची शक्यता आहे.

आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे

अभिजित वंजारी आपले स्थान कायम राखणार, सुधाकर कोहळे भाजपला विजय मिळवून देणार, की अपक्ष नितेश कराळे यांच्या कामगिरीमुळे, तर प्रा. अनिल सोले यांच्या भूमिकेमुळे निकालाच्या समीकरणात अनपेक्षित ‘टिवस्ट’ येणार, याचे उत्तर मतमोजणीनंतरच मिळेल. त्यामुळे या निवडणुकीत प्रचारातील दावे नव्हे, तर पदवीधर मतदारांनी मतपेटीतून दिलेला कौलच अंतिम ठरणार आहे. दुसरीकडे, रिपब्लिकन नेते प्रेम गजभिये यांनी आंबेडकरी मतदारांना काँग्रेस व भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. त्यांचा आवाहनाचा व्हिडीओ समाज माध्यमावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला होता, हे विशेष.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More