१,२३७ पदांपैकी १४५ पदे निरसित; शिक्षक, शिक्षकेतर पदांचा समावेश
The Exposer
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुधारित आकृतिबंधाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २३ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. विद्यापीठातील एकूण १,२३७ पदांपैकी १४५ पदे निरसित करण्यात आली असून, उर्वरित १,०९२ पदांच्या सुधारित आकृतिबंधास २३ ऑक्टोबर रोजी मान्यता देण्यात आली आहे.
लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाची निर्मिती झाल्यानंतर नागपूर विद्यापीठाकडील १४९ पदे त्या विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित पदांचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यात आला. या आकृतिबंधाला उच्चस्तरीय सचिव समितीने ६ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली होती. त्यानुसार आता शासनाने अंतिम मान्यता दिली आहे.
शिक्षकांच्या २५९ पदांचा समावेश
सुधारित आकृतिबंधात सात सांविधिक पदांसह २५९ शिक्षक पदांचा समावेश आहे. यामध्ये ३९ प्राध्यापक, ७० सहयोगी प्राध्यापक आणि १४४ सहायक प्राध्यापक पदांचा समावेश आहे. याशिवाय प्राचार्य आणि अधिष्ठाता पदांचाही समावेश करण्यात आला आहे. शिक्षक समकक्ष संवर्गातील १६ पदांनाही मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य वैज्ञानिक अधिकारी, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक, सहायक संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, उपग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल आणि इतर पदांचा समावेश आहे.
शिक्षकेतर पदांचाही आकृतिबंधात समावेश
शिक्षकेतर संवर्गात गट-अमधील ४८, गट-बमधील ४५ आणि गट-कमधील ४४० पदांचा समावेश आहे. गट-कमध्ये उच्च श्रेणी लिपिकाची १०७ आणि निम्न श्रेणी लिपिकाची २०७ पदे नमूद करण्यात आली आहेत. गट-ड संवर्गात २४९ पदे असून, पूर्वीच्या गट-ड संवर्गातील २८ पदांचाही स्वतंत्रपणे उल्लेख आहे. या पदांमध्ये प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर, शिपाई, चौकीदार, सफाईगार आणि इतर पदांचा समावेश आहे।
हेही वाचा
[ या’ कर्मचाऱ्यांच्या मानधनात घसघशीत वाढ, पण जीआरमधील ‘त्या’ एका अटीमुळे उडाला मोठा गोंधळ ! ]
गट-डमधील पदभरती बाह्य यंत्रणेमार्फत
शासन निर्णयानुसार, गट-ड संवर्गातील संबंधित मनुष्यबळाची पदभरती बाह्य यंत्रणेमार्फत करण्याचे निर्देश विद्यापीठाला देण्यात आले आहेत. तसेच, राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांच्या आकृतिबंधात सुधारणा करण्याची बाब विचाराधीन असल्याने नागपूर विद्यापीठाच्या आकृतिबंधाला दिलेली मान्यता भविष्यातील सुधारणांच्या अधीन राहणार आहे.
या निर्णयामुळे नागपूर विद्यापीठातील विविध संवर्गांतील पदांची सुधारित रचना निश्चित झाली आहे. मात्र, या शासन निर्णयात पदभरतीसाठी स्वतंत्र जाहिरात किंवा भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
Author: प्रमोद गणवीर
पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर














