विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती व सासूविरुद्ध गुन्हा; पती अटकेत

The Exposer
नागपूर : हुडकेश्वर परिसरातील एका 28 वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पती व सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई हुडकेश्वर पोलिसांनी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता नितीन डांगसे (वय 28) हिचा विवाह आरोपी नितीन नामदेवराव डांगसे (वय 34) याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर नितीन डांगसे व त्याची आई पार्वतीबाई नामदेवराव डांगसे (वय 60) यांनी अंकिता हिला विविध कारणांवरून मानसिक व शारीरिक त्रास देत सतत छळ केल्याचा आरोप आहे.
या छळाला कंटाळून अंकिता हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार तिचे वडील सुनील मंगल पेदुलवार यांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अपराध क्रमांक 476/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108 अंतर्गत गुन्हा नोंदविला.
या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून पिवळ्या रंगाची ओढणी व स्टीलची कडी जप्त केली आहे. तसेच आरोपी नितीन नामदेवराव डांगसे याला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीविरुद्धही पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे करीत असून प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More