– २.६० लाखांची खंडणी उकळल्यानंतर ‘ब्लॅकमेल’
– विवाहितेशी गैरवर्तन केल्याचा आरोप, आरोपी फरार
The Exposer
नागपूर : हिंगणा परिसरात एका विवाहितेला तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी उकळून, त्यानंतर ब्लॅकमेल करून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय विवाहितेची आरोपी विष्णू मारोतराव बनकर याच्याशी पूर्वीपासून ओळख होती. मोबाईलद्वारे संपर्कात असलेल्या आरोपीने महिलेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेतले. या माध्यमातून त्याने सुमारे २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल उकळल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर आरोपीने अधिक पैशांची मागणी केली. आर्थिक अडचणींमुळे महिलेने असमर्थता दर्शवल्यानंतर आरोपीने तिच्यावर दबाव टाकत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पतीच्या जीवाची भीती दाखवत त्याने नरसाळा परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन गैरवर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी हिंगणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











