डॉलर एक्स्चेंजचा सौदा अन् मिरची पावडरचा हल्ला!

– नागपुरात फॉरेक्स कंपनीच्या व्यवस्थापकाला ओढले जाळ्यात, ७.१६ लाखांनी लूटले

The Exposer
नागपूर : अमेरिकन डॉलरचे भारतीय चलनात रूपांतर करण्याच्या नावाखाली फॉरेक्स कंपनीच्या व्यवस्थापकाला जाळ्यात ओढून तब्बल ७ लाख १६ हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाठोडा येथील खिलेश श्रीरामलाल साहू (वय ३१) हे एका फॉरेक्स कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ४ जून रोजी सायंकाळी त्यांना व्हॉट्सॲपवर कॉल करून ७,५०० अमेरिकन डॉलर भारतीय चलनात बदलण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. मोठा व्यवहार असल्याने साहू हे ७.१६ लाख रुपये रोख रक्कम घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचले.
मात्र आरोपींनी वारंवार लोकेशन बदलत त्यांना अखेर अंबाझरी तलावाजवळील सुनसान भागात बोलावले. तेथे पोहोचताच स्कूटरवरून आलेल्या तीन अज्ञात लुटारूंनी त्यांच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकली. साहू यांना काही समजण्याआधीच आरोपींनी रोकड भरलेली बॅग आणि मोबाईल हिसकावून पळ काढला.
घटनेनंतर साहू यांनी स्वतःची अवस्था कंपनीला कळवून उपचारासाठी रुग्णालय गाठले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबाझरी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. आरोपींना पीडिताकडे मोठी रोकड असल्याची पूर्वकल्पना होती का, याचाही तपास सुरू असून आतील व्यक्तीच्या सहभागाची शक्यता नाकारलेली नाही.
सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि संबंधित व्हॉट्सॲप क्रमांकाची तांत्रिक चौकशी करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुरेश मांते पुढील तपास करीत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More