– टीपू सुलतान चौकात दोन मित्रांतील संघर्षाचे रक्तरंजित हत्याकांडात रूपांतर

The Exposer
नागपूर : यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संघर्ष नगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री दोन तरुणांमधील जुन्या वादाचे पर्यवसान खुनात झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत युवकाचे नाव सलमान अशफाक अन्सारी (रा. संघर्ष नगर, यशोधरानगर) असे आहे. तर या प्रकरणात मुज्जमिल अली हसन अली (वय १८) याचे नाव समोर आले असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्राथमिक तपासानुसार, एका तरुणीशी संबंधित प्रेमप्रकरणातून सलमान आणि मुज्जमिल यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. दोघेही एकमेकांच्या परिचयातील असल्याने या विषयावरून अनेकदा त्यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या होत्या. याच वादातून दोघांमध्ये वैर निर्माण झाल्याचे तपासात समोर आले आहे.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास संघर्ष नगरातील टीपू सुलतान चौक परिसरात दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या झटापटीत सलमान गंभीर जखमी झाला. हल्ल्यात धारदार शस्त्राचा वापर झाला का, याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
घटनेनंतर जखमी सलमानला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या युनिट-५च्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, नेमके कारण, हल्ल्याची पद्धत आणि इतर आरोपींचा सहभाग याबाबत सखोल तपास सुरू आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











