उपराजधानी हादरली! भरचौकात दुहेरी हत्याकांड; अवघ्या २४ तासांत तिसरी हत्या

– तलवार-चाकूंचा थरार; कमला नेहरू महाविद्यालयासमोर दोन युवकांची निर्घृण हत्या
– नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह

The Exposer
नागपूर : उपराजधानी नागपूर पुन्हा एकदा रक्तरंजित हत्याकांडाने हादरली आहे. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधवारी बाजार परिसरात भरचौकात पाच ते सहा हल्लेखोरांनी दोन युवकांवर तलवार, चाकू आणि दगडांनी जीवघेणा हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली. या दुहेरी हत्याकांडामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अवघ्या २४ तासांत तिसरा खून झाल्याने पोलिसांच्या कायदा व सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मृतांची ओळख आदित्य ऊर्फ सोनू भोंडवे (२५, सोमवारी क्वार्टर) आणि आदित्य राहूलकर (२३) अशी झाली आहे.

भर बाजारात रक्तरंजित हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास तीन दुचाकींवर आलेल्या पाच ते सहा युवकांनी कमला नेहरू महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही युवकांना घेरले. सुरुवातीला वाद घालत शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी पाठीमागे लपवून ठेवलेली धारदार शस्त्रे बाहेर काढत दोघांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
जीव वाचवण्यासाठी दोन्ही युवकांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत भरचौकातच त्यांना गाठले आणि बेछूट वार करून दोघांचाही खून केला. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

५० लोक बघत राहिले, आरोपींनी माजवला दहशतीचा कहर

घटना घडली तेव्हा बुधवारी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुमारे ४० ते ५० नागरिकांसमोर हा थरार घडला. मात्र हल्लेखोरांच्या हातातील शस्त्रे आणि दहशतीमुळे कोणीही मध्यस्थी करण्याचे धाडस करू शकले नाही. खून केल्यानंतर आरोपींनी नागरिकांना धमकावत घटनास्थळावरून पलायन केले.

सीसीटीव्हीत कैद झाला मृत्यूचा थरार

हे संपूर्ण दुहेरी हत्याकांड परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहेत. या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे आणि त्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गँगवार की जुन्या वैमनस्याचा बदला?

गेल्या काही महिन्यांत नागपुरात खून, टोळी संघर्ष आणि जुन्या वैमनस्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकांचा सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

सक्करदरा पोलिसांचा तपास वेगात

या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More