– गुन्हेगारीचा मार्ग सोडा, अन्यथा कायद्याचे बसेल फटके
– १३४ आरोपींची हजेरी, सराईत गुन्हेगारांना दिला इशारा
The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ क्रमांक ५ अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा यांच्या नेतृत्वाखाली यशोधरानगर, कळमणा, पारडी, वाठोडा आणि भांडेवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांना एकत्र बोलावून त्यांची पडताळणी करण्यात आली. यावेळी पुन्हा गुन्हा केल्यास गय नाही, गुन्हेगारीचा मार्ग सोडा, अन्यथा कायद्याचे फटके बसतील, असा इशारा परिमंडळ क्रमांक 5 चे पोलिस उपायुक्त डीसीपी नित्यानंद झा यांनी इशारा दिला.
यावेळी एकूण १३४ सराईत आरोपींची हजेरी लावली होती. यामध्ये यशोधरानगर ठाण्यातर्गतचे – १२, कळमणा – ६०, पारडी – १६, वाठोडा – ८, भांडेवाडी – ३८ जणांचा समावेश होता. या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले तसेच भविष्यात कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांपासून दूर राहण्याचा कडक इशारा देण्यात आला.११ जून रोजी सायंकाळी आयोजित या विशेष उपक्रमात यशोधरानगर व कळमणा पोलीस ठाण्यांतील सराईत गुन्हेगारांना यशोधरानगर पोलीस ठाण्यात, तर पारडी, वाठोडा आणि भांडेवाडी पोलीस ठाण्यांतील गुन्हेगारांना पारडी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी त्यांच्या सध्याच्या हालचाली, उपजीविकेची साधने आणि सामाजिक वर्तनाची माहिती घेण्यात आली.
मकोका, एमपीडीए आणि हद्दपारीचा इशारा
पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा यांनी उपस्थित गुन्हेगारांना स्पष्ट शब्दांत बजावले की, भविष्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा केल्यास मकोका, एमपीडीए व हद्दपारीसारख्या कठोर कायदेशीर कारवाया करण्यात येतील. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या, खंडणी, भाईगिरी, अवैध धंदे, मारामारी, शस्त्रांचा वापर तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर गुन्हेगारी जीवन सोडून मुख्य प्रवाहात येणाऱ्यांना पोलिसांकडून आवश्यक सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, पुन्हा-पुन्हा गुन्हे करणारे आरोपी आढळल्यास त्यांच्यावर मकोका, एमपीडीएसह प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही मोहीम पोलीस आयुक्त नागपूर शहर, सहपोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त नित्यानंद झा यांनी राबविली.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ (कळमणा विभाग), पारडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच यशोधरानगर, कळमणा, पारडी, भांडेवाडी आणि वाठोडा पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तपास पथके आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक











