नागपूर मध्यवर्ती कारागृहात योगाची ऊर्जा!

– आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात; ७ दिवसीय शिबिरातून बंद्यांना मानसिक शांततेचा नवा मार्ग

The Exposer
नागपूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृहात सात दिवसांचे योग व ध्यानधारणा शिबिर उत्साहात पार पडले. दिनांक १५ जून ते २१ जून २०२६ या कालावधीत नागपूर मध्यवर्ती कारागृह, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि स्व. रामदासजी दगडुजी बुंदे शिक्षण संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला बंद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

डॉ. सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रेरणेने तसेच योगेश देसाई, विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक तथा कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग नागपूर वैभव सु. आगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये योगासने, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया आणि तणाव व्यवस्थापनाची विविध तंत्रे शिकविण्यात आली. योगाच्या माध्यमातून शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक शांतता, भावनिक संतुलन आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विनय सगदेव, जिल्हा समन्वयक, आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित करत योगामुळे शरीर निरोगी, सुदृढ आणि मन प्रसन्न राहते, असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात अतिरिक्त अधीक्षक दिपा आगे यांनी योग हा केवळ व्यायाम नसून आत्मपरिवर्तनाचा मार्ग असल्याचे सांगितले. योग मनातील नकारात्मकता दूर करून शांतता, संयम, सहनशीलता आणि आत्मविश्वास वाढवतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता असते आणि योग त्या क्षमतेला योग्य दिशा देतो, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक बंद्याने दररोज किमान २० मिनिटे योगासाठी द्यावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

पुरुष बंद्यांसाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे नवीन खानोरकर आणि सुनिल आमटे यांनी योग प्रशिक्षण दिले. तर महिला बंद्यांसाठी स्व. रामदासजी दगडुजी बुंदे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सोनाली बुंदे, योगप्रशिक्षिका रश्मी माटे, सारिका जावळेकर, नंदिनी कुमरे आणि गुणगुण कारमोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार मयुरी टेंबरे (सकाळ) उपस्थित होत्या.आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम मंगेश चारडे (सिनियर इव्हेंट एक्झिक्युटिव्ह, लोकमत मीडिया), प्रमोद पारधे (एक्झिक्युटिव्ह, लोकमत मीडिया), विनय सगदेव, नवीन खानोरकर, सुनिल आमटे, कारागृह अधीक्षक वैभव सु. आगे, अतिरिक्त अधीक्षक दिपा आगे आणि उपअधीक्षक श्रीधर प. काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ तुरुंग अधिकारी मनोहर भोसले, वामन निमजे, बाळासाहेब शिंदे, शिक्षक गणपत खोकले, मंगेश देशमुख, शिक्षिका स्वाती भगत, शिपाई सुभाषचंद्र शाहू आणि हवालदार निता पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंगेश देशमुख यांनी केले. योग, ध्यान आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून बंद्यांच्या पुनर्वसनाला नवी दिशा देणारा हा उपक्रम नागपूर मध्यवर्ती कारागृहासाठी प्रेरणादायी ठरला.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More