– लकडगंज हद्दीतील मालधक्का परिसरातील थरारक घटना
The Exposer
नागपूर : लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्का परिसरात सोमवारी पहाटे सुमारे 5 वाजताच्या सुमारास एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात आरोपीने धारदार कटरच्या साहाय्याने गळ्यावर वार करून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृतकाची ओळख रम्मू उर्फ अब्दुल रहमान (रा. शांतीनगर) अशी झाली आहे. पहाटेच्या वेळी घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैयक्तिक वैमनस्य, जुना वाद किंवा अन्य कोणत्या कारणातून ही हत्या झाली का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या थरारक हत्येमुळे मालधक्का परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











