गोंदियातील बिरसी विमानतळावरील कथित गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई

– एजीएमसह कंत्राटदाराविरोधात नियमित गुन्हा दाखल

The Exposer
नागपूर : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) भ्रष्टाचारविरोधी शाखेने (Anti-Corruption Branch), नागपूर यांनी गोंदिया येथील बिरसी विमानतळावरील नागरी बांधकाम कामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी मोठी कारवाई करत नियमित गुन्हा (Regular Case) नोंदविला आहे.

या प्रकरणात विमानतळ प्राधिकरणाच्या (Airport Authority of India) गोंदिया विमानतळावरील सहाय्यक महाव्यवस्थापक (अभियांत्रिकी–सिव्हिल) संजीव कुमार सिंह, तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट येथील एम/एस रायसिंह अँड कंपनी यांच्यासह इतर अज्ञात शासकीय अधिकारी आणि खासगी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीबीआयच्या प्राथमिक माहितीनुसार, बिरसी विमानतळावरील नागरी कामांच्या अंमलबजावणीदरम्यान नियमबाह्य पद्धतीने कामकाज झाल्याचा आणि त्यामध्ये आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आरोपांची सखोल चौकशी सुरू असून संबंधित कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि कामांच्या प्रक्रियेची तपासणी केली जात आहे.

या प्रकरणात आणखी काही शासकीय अधिकारी अथवा खासगी व्यक्तींचा सहभाग होता का, याचाही तपास सीबीआयकडून सुरू असून चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More