– सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक; अल्पवयीन विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग
The Exposer
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोकनाथ छोटेलाल यादव (वय ६२, रा. प्लॉट क्रमांक १७३५, मिनीमातानगर, जानकीनगर चौक, कळमना, नागपूर) हे १ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता दुकानात गेले होते. रात्री सुमारे ६.३० वाजता घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या स्टोअर रूमच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६१०/२०२६, कलम ३०५(अ), भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सुमारे १० ते १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गौरव सचिन पालीवाल (वय १९, रा. प्लॉट क्रमांक १७३५, मिनीमातानगर, जानकीनगरजवळ, कळमना, नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार अन्य एका आरोपीसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून सोन्याचा हार, सोन्याची लगड, चांदीचे कंबरपट्टे, चांदीचे कडे, पायातील चांदीचे बिछवे, चांदीच्या पायपट्ट्या आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ११ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक ५ निकेतन कदम आणि सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्होळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संतोषकुमार रामलोढ, तपास पथक कर्मचारी पोलीस हवालदार रविकुमार शाहू, पोलीस हवालदार प्रदीप पवार, पोलीस अंमलदार मंगेश लोही, पोलीस अंमलदार संतोष पांडे, पोलीस अंमलदार अनिल जाधव आणि पोलीस अंमलदार प्रफुल्ल गोहोकार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Author: संतोष तायडे
संपादक











