– आरोपी माया उके व मंगला उईकेवर कठोर कारवाईची मागणी
The Exposer
नागपूर : दीक्षाभूमी परिसरात कथित वादग्रस्त कृत्ये करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या माया उके आणि मंगला उईके यांच्याविरुद्ध तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांना दीक्षाभूमी परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव करावा, अशी ठाम मागणी १३ महिलांच्या शिष्टमंडळाने नागपूर शहर पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली.
पुरोगामी महिला संघटना, नागपूरच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटनांतील महिलांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन हे निवेदन सादर केले. शिष्टमंडळात एकूण १३ महिला सहभागी झाल्या होत्या.
निवेदनात म्हटले आहे की, जगप्रसिद्ध दीक्षाभूमी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिलेली ऐतिहासिक आणि पवित्र भूमी असून, या ठिकाणाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही व्यक्तींमार्फत सातत्याने होत आहे. त्यामध्ये माया उके व मंगला उईके यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, ९ जुलै रोजी दीक्षाभूमीवरील भिक्षुणींचे चिवर उतरविण्याचा प्रयत्न करून त्याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे आंबेडकरी आणि बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी ११ जुलै रोजी बजाजनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS-2023) अंतर्गत कलम 74, 76, 296, 351(2) आणि 352(3)(5) अन्वये गुन्हा दाखल झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली की, संबंधित महिलांवर तातडीने प्रभावी कारवाई करण्यात यावी, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी त्यांना दीक्षाभूमी परिसरात प्रवेशबंदी करण्यात यावी आणि सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या कृत्यांना कठोर आळा घालावा.
Author: संतोष तायडे
संपादक











