आदेश धाब्यावर; निवडणूक ड्युटीला दांडी! ९ शिक्षक व कर्मचाऱ्यांवर गुन्हा

– मतदार पुनरीक्षण अभियानात गैरहजेरी भोवली; निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर पोलिसांची कारवाई

The Exposer
नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार पुनरीक्षण अभियानात नियुक्ती असूनही निवडणूक कर्तव्यावर अनुपस्थित राहणे ९ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे. निवडणूक ड्युटीवर गैरहजर राहून शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५३ नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार दत्तात्रय जनार्दन धात्रक (वय ५६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त मतदार पुनरीक्षण अभियान राबविण्यात येत असून, या मोहिमेसाठी संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांची बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मतदार नोंदणी अधिकारी शिल्पा सोनाळे तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधितांना नियोजित वेळेत निवडणूक कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, आदेश असूनही संबंधित कर्मचारी ड्युटीवर हजर झाले नाहीत. एवढेच नव्हे, तर गैरहजेरीबाबत कोणतेही समाधानकारक कारण किंवा स्पष्टीकरणही त्यांनी सादर केले नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, मतदार पुनरीक्षणासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या, वेळबद्ध आणि अनिवार्य शासकीय कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

या ९ जणांवर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये प्रवीण घोडके (सहायक शिक्षक, घोडके प्रबोधिनी प्राथमिक विद्यालय), लता मेश्राम, सुवर्णा भस्मे, शंकर चांदेकर (सहायक शिक्षक, जवाहर नाईट स्कूल, सीताबर्डी), सचिन सुदाम राठोड, स्वाती जयंत महाजन (विदर्भ बुनियादी स्कूल), सुनीता मोहन मते (हेमंत जकाते विद्यालय, हुडकेश्वर), कल्याणी मारगोडे (आशा कार्यकर्ती, बाबुळखेड़ा) आणि पूजा मेश्राम (कर संकलक, नागपूर महानगरपालिका) यांचा समावेश आहे.

संबंधित गैरहजेरीचा कालावधी १५ जुलै २०२५ ते ९ जुलै २०२६ दरम्यानचा असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३६ वाजता सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ तसेच जनप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ३२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सदर पोलीस करीत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More