१२ तास उलटले… तरी ‘इक्का’ मोकाटच!

अट्टल घरफोड्याचा अद्यापही थांगपत्ता नाही
– शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांना ‘चकवा’

The Exposer
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेला अट्टल घरफोडीचा आरोपी इक्का उर्फ हर्ष महेंद्र रामटेके (रा. तिरोडा, जि. गोंदिया) हा सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या ताब्यातून धाडसी पद्धतीने फरार झाला. घटनेनंतर विविध विशेष पथके त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. मात्र, घटनेला तब्बल १२ तास उलटूनही आरोपीचा कोणताही मागमूस पोलिसांना लागलेला नसल्याने नागपूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानेवाडा स्मशानभूमीतील पवन सूर्यवंशी हत्याकांडातील सात आरोपींसह इक्कालाही हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. सकाळी एका आरोपीला शौचालयात नेण्यात आले असताना इक्कानेही शौचालयात जाण्याची मागणी केली. त्यानंतर लॉकअप गार्ड त्याला बाहेरील शौचालयात घेऊन गेला.

याच संधीचा फायदा घेत इक्काने गार्डची नजर चुकवत तेथून पलायन केले. आरोपी फरार झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली आणि शहरातील विविध भागांत नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू करण्यात आली.

विशेष म्हणजे, पोलिसांच्या ताब्यातून पसार होण्याची ही इक्काची पहिली घटना नाही. यापूर्वीही त्याने मेडिकल रुग्णालयातून पोलिसांना चकवा देत पलायन केले होते. त्यामुळे वारंवार पोलिसांच्या ताब्यातून आरोपी निसटत असल्याने सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, आरोपीचा शोध सुरू असला तरी १२ तास उलटूनही तो पोलिसांच्या हाती न लागल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आता फरार आरोपीला पोलिस किती लवकर जेरबंद करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More