२४ तास उलटले… तरी ‘इक्का’ पोलिसांच्या हाती नाही; हुडकेश्वर पोलिसांना देतोय चकवा!

– अट्टल घरफोड्याच्या फरारीने पोलीस यंत्रणेची झोप उडाली

The Exposer
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यातून धाडसी पद्धतीने फरार झालेला अट्टल घरफोड्या इक्का उर्फ हर्ष महेंद्र रामटेके (रा. तिरोडा, जि. गोंदिया) याचा शोध घेण्यात नागपूर पोलिसांना तब्बल २४ तासांनंतरही यश आलेले नाही. आरोपी फरार झाल्यानंतर शहरभर शोधमोहीम, नाकाबंदी आणि विशेष पथके तैनात करण्यात आली असली तरी आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने पोलीस यंत्रनेची झोप उडाली आहॆ.

मिळालेल्या माहितीनुसार, मानेवाडा स्मशानभूमीतील पवन सूर्यवंशी हत्याकांडातील सात आरोपींसह इक्कालाही हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी एका आरोपीला शौचालयात नेण्यात आले असताना इक्कानेही शौचालयात जाण्याची मागणी केली. लॉकअप गार्ड त्याला बाहेरील शौचालयात घेऊन गेला. त्याच वेळी संधी साधत इक्काने गार्डची नजर चुकवली आणि क्षणार्धात तेथून पलायन केले.

आरोपी पसार झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. विविध गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस आणि विशेष पथकांना आरोपीच्या शोधासाठी पाचारण करण्यात आले. शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. मात्र, २४ तास उलटूनही आरोपीचा कोणताही ठोस मागमूस पोलिसांना लागलेला नाही.

विशेष म्हणजे, पोलिसांच्या ताब्यातून पसार होण्याची ही इक्काची पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याने मेडिकल रुग्णालयातून पोलिसांना चकवा देत पलायन केले होते. त्यामुळे हा आरोपी पुन्हा एकदा पोलिसांच्या तावडीतून निसटल्याने खळबळ उडाली आहॆ.

या घटनेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्यासह संपूर्ण नागपूर पोलीस दलावर मोठा दबाव निर्माण झाला असून, फरार आरोपीचा तातडीने शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. २४ तास उलटल्यानंतरही आरोपी मोकाट असल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत असून, आता इक्काला पोलिस किती लवकर जेरबंद करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More