मारवाडी चौकात छुप्या पद्धतीने मध्यरात्रीनंतरही सुरू दुकानं; एक शहर… दोन नियम?

– रात्री ११ नंतर शहरभर शटर डाउन; मात्र तहसील हद्दीत काही प्रतिष्ठाने पहाटेपर्यंत सुरू असल्याची चर्चा

The Exposer
नागपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशनुसार शहरातील बहुतांश हॉटेल्स, भोजनालये, सावजी, बिर्याणी सेंटर तसेच इतर दुकाने वेळेत बंद होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत असला तरी त्यांनी पोलिसांच्या आदेशाचे पालन केले आहे.

मात्र, तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोमीनपुरा व मारवाडी चौक परिसरात काही हॉटेल्स आणि दुकाने रात्री २ ते ३ वाजेपर्यंत सुरू राहत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी बाहेरून शटर बंद असल्याचा आभास निर्माण केला जातो; मात्र आतमध्ये ग्राहकांना सेवा दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

मारवाडी चौक परिसरात काही पानठेले, चहाचे दुकान तसेच सी.ए. रोडवरील एका सावजी हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची वर्दळ असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. संबंधित सावजी हॉटेलमध्ये मद्यपानास मनाई असल्याने काही ग्राहक बाहेरच वाहनांमध्ये किंवा रस्त्याकडेला मद्यप्राशन करत असल्याचीही चर्चा आहे.

यामुळे “शहरातील सर्वांसाठी एक नियम आणि काही भागांसाठी दुसरा नियम का?” असा सवाल व्यावसायिक व नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील इतर व्यापाऱ्यांनी वेळेत दुकाने बंद करून आदेशाचे पालन केले असताना, काही ठिकाणी नियमांचे कथित उल्लंघन होत असेल तर त्यावर समान निकषांनुसार कारवाई का होत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

या संदर्भात रात्री उशिरापर्यंत काही प्रतिष्ठाने सुरू ठेवण्यासाठी कथित “प्रोटेक्शन” कुणाचे?, अशा प्रश्न वजा चर्चेसह धनराज व सचिन या व्यक्तीच्या नावाची सुद्धा उलट सुलट चर्चा परिसरात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आणि त्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे आदेश- निर्देशांचे उल्लंघन होत आहे का याची तपासणी करावी आणि नियमभंग आढळल्यास संबंधितांवर प्रशासनाने निष्पक्ष व समान कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More