“वर्दीचा सन्मान म्हणजे कायद्याचा मान!”; नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा कडक इशारा

– कर्तव्यावर सिव्हिल ड्रेसला नाही माफी; प्रत्येक पोलीस वर्दीतच, प्रत्येक चौकात पोलीस, प्रत्येक नागरिक सुरक्षित!

The Exposer
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शिस्तबद्ध, दृश्यमान आणि तंत्रज्ञानाधारित पोलीसिंगची नवी दिशा दिली आहे. “पोलीसाची खरी ओळख त्याची वर्दी” या भूमिकेला प्राधान्य देत कर्तव्यावर असताना प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्दीतच असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

यासोबतच शहरभर २४ तास कडक पोलीस बंदोबस्त, सातत्यपूर्ण पेट्रोलिंग, चौकाचौकात तपासणी आणि दृश्यमान पोलीसिंगद्वारे गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याबरोबरच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, नुकत्याच गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेताना पोलीस आयुक्तांना अनेक त्रुटी आढळून आल्या. यावेळी काही पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतानाही वर्दीऐवजी सिव्हिल ड्रेसमध्ये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब अत्यंत गंभीर मानत त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना फटकारले आणि कर्तव्यावर असताना वर्दी परिधान करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.

सूत्रांच्या माहितीनुसार, “वर्दी ही केवळ कपडे नसून ती कायद्याचा अधिकार, शिस्त आणि जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. कर्तव्यावर असलेला प्रत्येक पोलीस वर्दीतच दिसला पाहिजे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

अपवादात्मक परिस्थितीत, जसे की गुन्हेगारांना पकडण्यासाठी रचण्यात येणाऱ्या गुप्त सापळ्यांमध्ये सिव्हिल ड्रेसचा वापर आवश्यक असू शकतो. मात्र, नियमित पोलीस ठाण्यातील कामकाज, बंदोबस्त किंवा सार्वजनिक ठिकाणी ड्युटी बजावताना सिव्हिल ड्रेसचा वापर सहन केला जाणार नाही, अशी भूमिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते.

वर्दी म्हणजे जनतेचा विश्वास

पोलीस वर्दी ही नागरिकांसाठी सुरक्षिततेचे आणि विश्वासाचे प्रतीक मानली जाते. एखादा नागरिक अडचणीत असताना मदतीसाठी सर्वप्रथम वर्दीतील पोलीसच शोधतो. त्यामुळे वर्दी ही केवळ शिस्तीचा भाग नसून नागरिकांप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी ओळख असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

नागपूरमध्ये राबविण्यात येत असलेले व्यापक सुरक्षा नियोजन केवळ बंदोबस्तापुरते मर्यादित नसून “वर्दीचा सन्मान, कडक शिस्त आणि दृश्यमान पोलीसिंग” या त्रिसूत्रीवर आधारित आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होण्यासोबतच नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More