– बजाजनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; दीक्षाभूमीतील सत्तासंघर्ष आता पोलीस ठाण्यापर्यंत
The Exposer
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती (दीक्षाभूमी)तील अध्यक्षपदाच्या वादाने नवे वळण घेतले आहे. समितीच्या जून २०२६ मध्ये झालेल्या बैठकीत विलास गजघाटे यांची सदस्यांनी बहुमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा माजी अध्यक्ष म्हणून उल्लेख केला जात असून, त्यांनी स्वतःला समितीचे अध्यक्ष दर्शवत बजाजनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
या फिर्यादीवरून बजाजनगर पोलिसांनी विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, शरद मेश्राम आणि मिलिंद थुल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. एफआयआरनुसार, २४ जुलै रोजी संबंधित चौघांनी कथितरित्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या कार्यालयात अनधिकृत बैठक घेतली.
तसेच समितीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून दुसरे कुलूप लावल्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य कक्षाचे कुलूप तोडून तेथेही दुसरे कुलूप लावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे समिती व महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाल्याचा दावाही फिर्यादीत करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतनसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बजाजनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 332(सी), 334(1), 334(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दुसरीकडे, फिर्यादीत भदंत सुरेई ससाई यांनी समितीच्या संविधानानुसार ५ जुलै २०२६ रोजी विलास गजघाटे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा दावा केला असून, त्यानंतरही त्यांनी कथितरित्या अनधिकृत कारवाया केल्याचा आरोप आहॆ.
Author: संतोष तायडे
संपादक











