दगडाने ठेचून युवकाची निर्घृण हत्या; अवघ्या काही तासांत दोन आरोपींना बेड्या

– जुन्या वादातून घडला खून; वाठोडा पोलिसांची जलद कारवाई, नंदनवन हद्दीतून आरोपी जेरबंद

The Exposer
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बॉयसिस कॉलेज मागील मोकळ्या जागेत एका २० वर्षीय युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत वाठोडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून जुन्या वादातून हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११ ते ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१० वाजण्याच्या दरम्यान सिम्बॉयसिस कॉलेज मागील मोकळ्या जागेत प्रतिक उर्फ आदी राजू करंडेकर (वय २०, रा. पारडी, नागपूर) याच्यावर अज्ञात आरोपींनी दगडाने डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. या प्रकरणी मृताचा भाऊ अपेक्षित राजू करंडेकर (वय २२) यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील माहिती संकलित करून आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आवेज इकबाल शेख (वय १९) आणि शाकिब शेख अब्दुल कलाम (वय २६) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसी चौकशीत आरोपींनी मृतकाशी असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून गाडीला कट लागल्याचा राग मनात धरून त्याला दगडाने ठेचून ठार मारल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास वाठोडा पोलीस करत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More