नशेच्या सौदागारांवर पोलिसांचा धडाका! एकाच रात्री ५ तस्कर जेरबंद; एमडी-गांजासह ३५ लाखांचा माल जप्त

– मादक पदार्थांची तस्करी, नागपूर पोलिसांनी धडक कारवाई

The Exposer
नागपूर : मादक पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच रात्रीत पाच नशेच्या सौदागारांना अटक केली. शहरातील वेगवेगळ्या भागांत केलेल्या कारवायांमध्ये एमडी (मेफेड्रोन) आणि गांजासह सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

स्कॉर्पिओत एमडीची डील; दोघे जाळ्यात

अँटी-नार्कोटिक्स दस्त्याने स्वामीनगर परिसरात सुरू असलेल्या एमडीच्या व्यवहाराचा पर्दाफाश केला. कारवाईत दानिश खान अबरार खान (४२), जाफरनगर आणि मुकर्रम मुनावर अली काजी (३२), स्वामीनगर यांना अटक करण्यात आली. दानिशकडून ११ ग्रॅम, तर मुकर्रमकडून १० ग्रॅम एमडी, दोन मोबाइल आणि स्कॉर्पिओ कार असा १७.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी एमडीचा साठा मोमिनपुरा येथील सैयद इरफान अली (३४) याच्याकडून आणल्याची माहिती दिल्याने त्याचा शोध सुरू आहे.

जॅबमधून ३२ ग्रॅम, बाथरूममध्ये ६७ ग्रॅम एमडी

क्राइम ब्रँचच्या सामाजिक सुरक्षा टीमने महालातील रेशन दुकानाजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या सलीम खान ऊर्फ चावल साजिद खान (४०) याला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडून ३२.२ ग्रॅम एमडी मिळाले. त्यानंतर त्याच्या घराच्या बाथरूममधून आणखी ६७.८१ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. अशाप्रकारे एकूण १०५.०२ ग्रॅम एमडी, दोन मोबाइल, सोन्याची अंगठी आणि मोपेड असा १३.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. चौकशीत आरोपीने हा माल जबलपूर रोडवरील हडकेश्वर परिसरातील संजय कलिया याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारच्या डिक्कीत दोन किलो गांजा; तिघे अटकेत

दरम्यान, कळमणा पोलिसांनी हस्तिनापूर-भिलगाव मार्गावर नाल्याजवळ संशयास्पदरीत्या उभी असलेल्या फोर्ड फिगो कारची झडती घेतली. कारच्या डिक्कीत बोरीमध्ये लपवून ठेवलेला २.०४३ किलो गांजा आढळला. या प्रकरणात अतिक रफीक खान (३३), कपिल नगर आणि अमित विनायक मानकर (३७), टेकानाका यांना अटक करण्यात आली. गांजासह मोबाइल आणि कार असा ४.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मोबाइल कॉल डिटेल्सवरून तस्करांच्या नेटवर्कचा शोध

या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जप्त मोबाइलच्या कॉल डिटेल्स आणि चौकशीच्या आधारे अमली पदार्थांचे मुख्य पुरवठादार तसेच या संपूर्ण नेटवर्कमधील इतर व्यक्तींचा शोध घेण्याची पोलिसांची तयारी आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More