भरधाव ट्रकने गाईला उडवले; जखमी गाईला वाचवण्यासाठी नागरिकांसह पोलिसांची धडपड!

– हल्दीरामसमोर गुरुवारी रात्रीची घटना; डॉक्टरांनी घटनास्थळीच केले उपचार, ट्रकचालकाला बेलतरोडी पोलिसांनी केली अटक

The Exposer
नागपूर : बेसा येथील हल्दीरामसमोर गुरुवारी रात्रीच्या सुमारास भरधाव ट्रकने रस्त्यावर असलेल्या गाईला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात गाय गंभीर जखमी झाली. धडकेनंतर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या गाईला वाचवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी जखमी गाईला मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर बेलतरोडी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आणि नागरिकांनी मिळून गाईला सुरक्षित करण्यासाठी धडपड केली. गाईची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ डॉक्टरांना घटनास्थळी बोलावले.

डॉक्टरांनी घटनास्थळीच जखमी गाईवर प्राथमिक उपचार केले. नागरिक आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे गाईला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली.

दरम्यान, गाईला धडक देणाऱ्या ट्रकचालकाला बेलतरोडी पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

भरधाव वाहनांमुळे केवळ माणसांच्याच नव्हे, तर रस्त्यावर फिरणाऱ्या मुक्या प्राण्यांच्याही जीवाला धोका निर्माण होत असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. अपघातानंतर जखमी गाईला वाचवण्यासाठी नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि त्यानंतर पोलिसांनी केलेली धडपड बघायला मिळाली..

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More