प्रेमसंबंधातून पतीच्या हत्येचा कट; पत्नी-प्रियकराने दारू पाजून संपविले!

– आधी प्रेमसंबंध, मग पतीच्या हत्येचा कट, लोखंडी रॉडने डोक्यात घाव

The Exposer
नागपूर : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचल्याचा धक्कादायक प्रकार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. पतीला आधी दारू पाजण्यात आली. तो नशेत असताना त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने घाव घालण्यात आले. त्यानंतर नाक-तोंड दाबून त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

ही हत्येची घटना ९ ते १० ऑगस्टदरम्यान घडली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला नेऊन टाकत घटनास्थळी दारूची बाटली ठेवून अपघाती मृत्यूचा बनाव रचण्यात आला. या प्रकरणी मृताची पत्नी पूजा सुधीर द्विवेदी (वय २२) आणि तिचा प्रियकर आशिषकुमार नरेशकुमार अग्निहोत्री (वय २९) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर महेंद्रप्रसाद द्विवेदी (वय ३३) हे गजानन नगर परिसरात भाड्याने राहत होते. राजीव नगर मेन रोड, हिंगणा-नागपूर रोडवरील विद्युत खांबाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यांच्या भावाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.मात्र, शवविच्छेदन अहवालात मृत्यू अनैसर्गिक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला.

तपासाची चक्रे वेगाने फिरविताना पोलिसांनी मृताची पत्नी पूजा हिच्या मोबाईलसह अन्य तांत्रिक बाबींची तपासणी केली. त्यातून पूजा हिचे आशिषकुमार याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासानुसार, या प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने दोघांनी मिळून सुधीर यांना संपविण्याचा कट रचल्याचा संशय तपासातून पुढे आला.

ठरलेल्या योजनेनुसार सुधीर यांना दारू पाजण्यात आली. ते नशेत असताना त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार करण्यात आले. त्यानंतर नाक व तोंड दाबून त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्या करूनही कट इथेच थांबला नाही. हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यानंतर मृतदेह घटनास्थळावर नेऊन टाकण्यात आला. मृतदेहाजवळ अर्धवट दारूची बाटली ठेवण्यात आली आणि हा प्रकार अपघात असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या तपासात हा बनाव उघडकीस आला.

विशेष म्हणजे, पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोनची तांत्रिक तपासणी केली असता त्यांनी वापरलेले जुने सिमकार्ड जाणूनबुजून बंद करून नवीन सिमकार्ड वापरल्याचेही समोर आले. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पूजा द्विवेदी आणि आशिषकुमार अग्निहोत्री यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(२), ६१ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय गवांदे करीत आहेत.

प्रेमसंबंधाचा शेवट पतीच्या हत्येत!

प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या कथित कटाचा शेवट पतीच्या हत्येत झाला आणि त्यानंतर खुनावर अपघाताचा पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे हा बनाव उघडकीस आला. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी अपघाती मृत्यूच्या नोंदीमागील कथित हत्येचे गूढ उकलले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More