– एकाच कर्मचाऱ्यावर प्रभागाची स्वच्छता अन् मानेवाडा घाटाची जबाबदारी
– घाटात कचऱ्याचे ढीग, शोकसभा हॉल अस्वच्छ, सुरक्षेचाही बोजवारा
The Exposer
नागपूर : प्रभाग क्रमांक ३४ मधील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोग्य जमादार संजय गवरे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रभागाच्या स्वच्छतेची जबाबदारी असताना मानेवाडा घाटावर मृतकांच्या नोंदी घेण्याचे कामही त्यांच्याकडे असल्याने एकाच व्यक्तीवर दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवून मनपा प्रशासनाने नेमके साधले तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

मानेवाडा घाट हा मोठ्या वर्दळीचा असून बेसा, बेलतरोडीसह शहराच्या विविध भागांतून अंत्यसंस्कारासाठी नागरिक येथे येतात. त्यामुळे घाटावर मृतकांच्या नोंदी, स्वच्छता आणि नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, एकाच कर्मचाऱ्याकडे प्रभागाची स्वच्छता आणि घाटाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने दोन्ही ठिकाणच्या व्यवस्थेवर परिणाम होत असल्याची तक्रार आहे.
घाटावरूनही ‘गायब’; अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांची ताटकळ

नागरिकांच्या आरोपानुसार, संजय गवरे हे मानेवाडा घाटावर कर्तव्यावर असतानाही काही वेळेसाठी कोणालाही न सांगता तेथून निघून जातात. परिणामी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना आवश्यक नोंदी आणि प्रक्रियेसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ३४ मधील त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्वच्छतेच्या कामांवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जमादार एकाच वेळी प्रभागात की घाटावर? असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.

मृतकांच्या नोंदीत चूक झाली तर जबाबदारी कोणाची?
मानेवाडा घाटावर मृतकांच्या नावांची नोंद घेताना नावाचे स्पेलिंग, वय, पत्ता किंवा अन्य तपशीलात चूक झाल्यास त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, हा देखील गंभीर प्रश्न आहे. अशा संवेदनशील नोंदींसाठी प्रशिक्षित आणि स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असताना मनपा प्रशासनाने ही जबाबदारी एका आरोग्य जमादाराकडेच का सोपविली, असा सवाल उपस्थित होत आहे.

दोन जबाबदाऱ्या नकोत; स्वतंत्र कर्मचारी द्या!
नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे स्पष्ट मागणी केली आहे. संजय गवरे यांच्याकडे मानेवाडा घाटाची अधिकृत जबाबदारी कायम ठेवायची असेल तर प्रभाग क्रमांक ३४ साठी स्वतंत्र स्थायी आरोग्य जमादार नियुक्त करावा. अन्यथा गवरे यांना केवळ प्रभागाच्या स्वच्छतेची जबाबदारी देऊन घाटासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावा, अशी मागणी होत आहे.
मानेवाडा घाटाची वर्दळ लक्षात घेता येथे दोन शिफ्टमध्ये स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकाच व्यक्तीकडे दोन महत्त्वाची कामे सोपविल्याने प्रभागातील नागरिकांना अपेक्षित सेवा मिळत नाही आणि घाटाची व्यवस्थाही प्रभावीपणे होत नसल्याची तक्रार आहे.
घाटावर कचऱ्याचे साम्राज्य; मग जमादार करतात तरी काय?
मानेवाडा घाटाच्या परिसरातील स्वच्छतेवरही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अंत्यविधीदरम्यान काढण्यात येणारे केस परिसरात अस्ताव्यस्त पसरलेले असल्याचे सांगण्यात येते. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून शोकसभा हॉलमध्येही अस्वच्छता असल्याचा आरोप आहे. हॉलच्या कोपऱ्यांमध्ये कचरा साठवून ठेवण्यात आल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे घाटाची जबाबदारी असलेले कर्मचारी प्रत्यक्षात करतात तरी काय? असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे.
युवकाच्या हत्येनंतरही सुरक्षा व्यवस्था बेभरवशाची?
काही दिवसांपूर्वी मानेवाडा घाटावर एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतरही घाटावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. एवढी गंभीर घटना घडूनही सुरक्षा रक्षकांची प्रभावी तैनाती का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुरक्षा रक्षक केवळ कागदावरच तैनात आहेत का? असा सवाल करत नागरिकांनी घाटावर प्रत्यक्ष आणि कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
मनपा प्रशासनाने ‘ड्युटी’चा खुलासा करावा!
प्रभाग क्रमांक ३४ची स्वच्छता, मानेवाडा घाटाची व्यवस्था, मृतकांच्या नोंदी आणि घाटाची सुरक्षा या सर्व बाबींवर मनपा प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी होत आहे. संजय गवरे यांच्याकडे नेमकी कोणती अधिकृत जबाबदारी आहे? त्यांची नियुक्ती कोणत्या आदेशानुसार करण्यात आली आहे? प्रभागातील स्वच्छतेसाठी त्यांची ड्युटी निश्चित आहे की मानेवाडा घाटासाठी? घाटावर त्यांच्या अनुपस्थितीत मृतकांच्या नोंदी आणि अंत्यसंस्काराशी संबंधित व्यवस्था कोण पाहते? या प्रश्नांची उत्तरे मनपा प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
एकाच कर्मचाऱ्यावर दोन जबाबदाऱ्या टाकून प्रभागाची स्वच्छता आणि मानेवाडा घाटाची व्यवस्था दोन्हीही ‘रामभरोसे’ ठेवू नयेत. प्रभाग ३४साठी स्वतंत्र आरोग्य जमादार, मानेवाडा घाटासाठी दोन शिफ्टमध्ये स्थायी कर्मचारी आणि तातडीने प्रभावी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















