गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला बेड… अन् काही तासांतच रक्ताचा सडा!

– हॉटेलच्या 302 क्रमांकाच्या खोलीत प्रेयसीची हत्या; प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न — हाताची नस कापली, गळ्यावरही वार

The Exposer
नागपूर : मनीषनगर परिसरातील एका हॉटेलच्या खोली क्रमांक 302 मध्ये तरुणीची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या खोलीत काही वेळापूर्वी गुलाबाच्या पाकळ्यांनी बेड सजवण्यात आला होता. त्याच खोलीत काही तासांतच रक्ताचा सडा पडला. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून तिच्यासोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याने स्वतःच्या हाताची नस कापण्यासह गळ्यावरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

मृत तरुणीची ओळख शिवानी (वय 28) अशी करण्यात आली असून ती अजनी येथील शताब्दी चौक परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमी तरुणाची ओळख किरण आत्राम (वय अंदाजे 40 वर्षे) अशी असून तो अजनी रेल्वे कॉलनी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

गुलाबाच्या पाकळ्या अन् त्यानंतर रक्ताने लाल झालेली खोली

हॉटेलच्या 302 क्रमांकाच्या खोलीत बेडवर गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे सुरुवातीला ही खोली एखाद्या खास भेटीसाठी किंवा भावनिक क्षणासाठी सजवण्यात आली असावी, असे वाटत होते. मात्र काही वेळातच याच खोलीतून मदतीसाठी किंकाळ्या ऐकू आल्या आणि हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली.

दरवाजा उघडल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतील दृश्य पाहून धक्का बसला. शिवानी रक्ताच्या थारोळ्यात निश्चल अवस्थेत पडली होती, तर किरण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. खोलीत चाकूही आढळून आला. शिवानीच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या खुणा असल्याचे समोर आले असून तिचे डोकेही रक्ताने माखलेले होते. खोलीतील रक्ताचे डाग आणि अस्ताव्यस्त सामानामुळे घटनेचे गांभीर्य स्पष्ट होत होते.

प्रियकरानेच केला आत्महत्येचा प्रयत्न?

घटनेनंतर किरणला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या हातावर जखमा असून गळ्यावरही वार केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या तपासात हत्या केल्यानंतर किरणने आत्महत्येचा प्रयत्न केला का, की दोघांमध्ये झालेल्या संघर्षात तोही जखमी झाला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जखमी तरुणाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याच्या चौकशीतून या घटनेचे अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

‘प्री-प्लॅन्ड मर्डर’चा संशय; 302 क्रमांकाची खोली हत्येसाठीच घेतली होती?

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे ही हत्या पूर्वनियोजित होती का? खोलीत गुलाबाच्या पाकळ्यांनी केलेली सजावट, त्यानंतर झालेली हत्या, घटनास्थळी आढळलेला चाकू आणि जखमी तरुणाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न—या सर्व बाबी पोलिस तपासाचा केंद्रबिंदू ठरल्या आहेत. हत्येच्या उद्देशानेच 302 क्रमांकाची खोली आधीपासून ठरवून घेण्यात आली होती का? चाकू आधीच खोलीत आणला होता का? की तो अचानक झालेल्या वादातून वापरण्यात आला? या प्रश्नांची उत्तरे तपासातूनच स्पष्ट होणार आहेत.

लग्नावरून वाद की नात्यातील तणाव?

प्राथमिक तपासात दोघांच्या नात्यात आणि लग्नाच्या विषयावरून काही वाद होता का, याचा तपास केला जात आहे. दोघेही रेल्वेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली असून शिवानीला वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर रेल्वेत नोकरी मिळाल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. दोघे हॉटेलमध्ये नेमके का आले? खोलीत गेल्यानंतर काय घडले? वाद झाला होता का? लग्नाबाबत काही निर्णय होणार होता का? आणि काही क्षणांत हा वाद इतका टोकाला कसा पोहोचला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.

CCTV फुटेज तपासणार; खोलीतील प्रत्येक हालचालीचा शोध

घटनेनंतर पोलिसांनी हॉटेलमधील CCTV फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. दोघे हॉटेलमध्ये कधी आले, त्यांच्यासोबत आणखी कोणी होते का, खोलीत प्रवेश केल्यानंतर कोण-कोण आले-गेले, तसेच घटनेपूर्वी आणि घटनेनंतर कोणत्या हालचाली झाल्या, याचा तपास केला जात आहे. तसेच चाकू खोलीत आधीपासून होता की तो बाहेरून आणण्यात आला, याचाही तपास महत्त्वाचा ठरणार आहे. घटनास्थळावरील रक्ताचे नमुने, शस्त्र, बोटांचे ठसे आणि इतर भौतिक पुरावे तपासासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.

302 नंबरच्या खोलीत दडलेलं नेमकं गूढ काय?

गुलाबाच्या पाकळ्यांनी सजलेला बेड… काही वेळातच रक्ताने माखलेली खोली… मृतावस्थेत तरुणी… गंभीर जखमी प्रियकर… आणि घटनास्थळी आढळलेला चाकू! या सर्व घटनाक्रमामुळे खोली क्रमांक 302 भोवती अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा पूर्वनियोजित खून होता का?
की नात्यातील वाद अचानक हिंसक झाला?
खोलीत चाकू आधीपासून आणला होता का?
खून केल्यानंतर प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केला का? की या संपूर्ण घटनेमागे आणखी कोणते गूढ दडले आहे?

या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपास, CCTV फुटेज आणि जखमी तरुणाच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत. सध्या पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून, 302 क्रमांकाच्या खोलीतील रक्तरंजित रहस्याचा उलगडा करण्याचे आव्हान तपास पथकासमोर आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More