– यशोधरानगरात डीबी पथकाची धडक कारवाई; तीन संशयित ताब्यात, गाय, कार, छुरीसह ५.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : कत्तलीसाठी गोवंशाची चोरी करून त्याची कत्तल करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर यशोधरानगर पोलिसांच्या डीबी पथकाने धडक कारवाई केली. संगम नगर परिसरातील पिवळी नदी नाल्याच्या काठावर एका गोवंशीय गायीला दाटीवाटीने कोंबून, चारा-पाण्याविना दोरीने बांधून कत्तलीसाठी आणल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून गाय, कार, धारदार छुरी आणि दोन मोबाईल असा एकूण ५ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफहाज अहमद उर्फ सोफी वल्द अब्दुल सलाम असारी (३६), समीर अहमद वल्द अब्दुल रहीम कुरेशी (२५) आणि शेख शाहरूख वल्द शेख रहमान (३२) यांना या कारवाईत ताब्यात घेण्यात आले.
गुप्त माहिती अन् थेट धाड
यशोधरानगर पोलीस ठाण्याचे डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, समीर अहमद कुरेशी आणि शाहरूख नावाचे इसम एमएच-१२-एमबी-१०७२ या हुंडाई कारमध्ये गोवंशीय गाय कत्तलीसाठी संगम नगरातील पिवळी नदी नाल्याच्या काठावर घेऊन आले आहेत.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पंच व स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे दोन इसम एका गोवंशीय गायीला कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गायीला दाटीवाटीने कोंबून चारा-पाणी न देता तिच्या मानेला व पायांना दोरीने घट्ट बांधण्यात आले होते.
‘चोरी करून आणली’—पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींची कबुली
पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधित गायीला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी करून कारमध्ये कोंबून कत्तलीसाठी आणल्याचे आरोपींनी सांगितल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. कत्तलीनंतर मिळणारे पैसे तिघे मिळून वाटून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळावरून गाय व अन्य मुद्देमाल जप्त केला.
यावेळी पोलिसांनी गोवंशीय पांढऱ्या रंगाची गाय – अंदाजे ₹२५ हजार, हुंडाई कार एमएच-१२-एमबी-१०७२ – अंदाजे ₹५ लाख, लोखंडी धारदार छुरी – ₹५००, विवो मोबाईल – ₹१० हजार, ओप्पो मोबाईल – ₹१० हजार, असा एकूण ₹५ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कठोर कलमांखाली कारवाई
या प्रकरणात भारतीय प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ मधील संबंधित तरतुदी तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त निबिनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त नित्यानंद झा आणि सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस चाँद शेख, पोलीस उपनिरीक्षक निलकंठ नन्नावरे तसेच डीबी पथकातील कर्मचारी पोलिस हवालदार गणेश गुप्ता, रवी अहिर, लक्ष्मण पडवळ, रितेश दुधे आदींनी ही कारवाई केली.
Author: संतोष तायडे
संपादक















