काँग्रेस नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; २४ तासांनंतरही हल्लेखोर मोकाट!

पोलीस आयुक्त स्वतः घटनास्थळी; क्राइम ब्रँचकडून तपासाला वेग — खंडणी प्रकरणासह राजकीय रंजिशेचीही चर्चा

The Exposer
नागपूर : पूर्व नागपुरातील भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेला २४ तास उलटूनही मुख्य हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नसल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

मंगळवारी रात्री उशिरा मोटघरे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही. मात्र, घरावर थेट गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वतः नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या निवासस्थानी भेट देत घटनेची माहिती घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी भाजप आमदार कृष्णा खोपडे, भाजप नगरसेवक बंटी कुकडे उपस्थित होते. यावेळी क्राइम ब्रँचसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास पथके उपस्थित होती.

२४ तासांनंतरही मुख्य आरोपी मोकाट

गोळीबाराच्या घटनेला बराच वेळ उलटूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तपासादरम्यान काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती असून, त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, गोळीबारापूर्वी आणि त्यानंतर संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे.

क्राइम ब्रँच मैदानात; अनेक शक्यतांचा तपास

गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात क्राइम ब्रँचची स्वतंत्र पथकेही तपासात सहभागी झाली आहेत. हल्ल्यामागे खंडणीचे प्रकरण, वैयक्तिक किंवा मालमत्तेशी संबंधित वाद तसेच राजकीय रंजिश यांसह विविध शक्यतांचा तपास केला जात असल्याचे समोर आले आहे.

मोटघरे यांनी काही काळापूर्वी खंडणी मागणाऱ्या एका आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या घटनेचा त्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, गोळीबारामागील कारणाबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष जाहीर केलेला नाही.

विकास ठाकरे यांच्यासह नेत्यांची घटनास्थळी धाव

गोळीबाराची माहिती मिळताच काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते मोटघरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. भाजपचे नगरसेवक अतुल कोटेचा यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. राजकीय नेते व कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने रात्री परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांसमोर आता आरोपींच्या अटकेचे आव्हान

नगरसेवकाच्या घरावरच गोळीबार झाल्याने या घटनेने नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नव्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलीस आयुक्तांनी स्वतः घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपासाला वेग आला असला, तरी गोळीबार करणारे नेमके कोण आणि त्यांचा उद्देश काय होता, याचा उलगडा कधी होणार? हा प्रश्न सध्या कायम आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि संशयितांची चौकशी यांच्या आधारे पोलिसांसमोर हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना तातडीने अटक करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More